विजयसिंह पंडित यांना विजयी करण्याची जबाबदारी आपली आहे
– कल्याण आखाडे
गेवराई (रिपोर्टर): 2019च्या विधानसभा निवडणुकीत जवळपास एक लाख लोकांनी टाकलेल्या विश्वासावर मी आज पर्यंत काम करताना कामाच्या माध्यमातून वेगळी ओळख निर्माण केली, याची जाणीव आपण ठेवाल आणि विकासाचा अजेंडा पुढच्या पाच वर्षात यशस्वीपणे राबवण्यासाठी येणार्या 20 तारखेला घड्याळासमोरचे बटन दाबून मला काम करण्याची संधी आणि आशीर्वाद द्यावा असे आवाहन महायुतीचे उमेदवार विजयसिंह पंडित यांनी केले तर शिवछत्र परिवाराने शिक्षण, सहकार आणि जलसिंचनाच्या बाबतीत मोठे काम केलेले आहे. यापुढील काळातही शिवछत्र परिवारास गेवराई विधानसभा मतदारसंघाचा कायापालट करू शकतो पराभवाची कसर भरून काढण्यासाठी विजयसिंह पंडित यांना विजयी करण्याची जबाबदारी आपली आहे असे प्रतिपादन सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव खाडे यांनी केले. गेवराई विधानसभा मतदारसंघातील बीडमध्ये राहत असलेल्या मतदारांचा स्नेह मेळाव्यात ते बोलत होते.
गेवराई विधानसभा मतदारसंघातील आणि बीडमध्ये राहत असलेल्या नागरिकांचा स्नेह मेळावा बीड येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी महायुतीचे उमेदवार विजयसिंह पंडित युव नेते उदयसिंह पंडित, सावता परिषदेचे अध्यक्ष कल्याणराव आखाडे, बाजार समितीचे उपसभापती विकास सानप,जयभवानीचे संचालक संभाजीराव पवळ, मोहनराव देवकते, विजय तांदळे विजय काकडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना विजयसिंह पंडित म्हणाले की, सत्ता नसतानाही गेल्या पाच वर्षात मी गेवराई विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात जाऊन लोकांपर्यंत पोहोचलो, त्यांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला. विरोधकांना मात्र मतदारसंघाचा काही भागही माहित नाही. त्यांना आमच्यावर आरोप करण्याचा अधिकार नाही. भगवान के घर देर है मगर अंधेर नही. एक दिवस आपल्याला न्याय मिळेल या भावनेतून आपण मतदारसंघातील लोकांना रस्ते पाणी आरोग्य असा मूलभूत सेवा मिळवून देण्यासाठी आणि त्यांचे वैयक्तिक स्वरूपाचे कामे करण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केले. या कामाच्या बळावर आपल्याकडे आशीर्वाद मागायला आलेलो आहे. येणार्या 20 तारखेला माझ्या नावासमोरच्या घड्याळाचे बटन दाबून मला प्रचंड मताधिक्याने विजयी करा असे भावनिक आव्हाने त्यांनी यावेळी केले.
शिवछत्र परिवाराला आशिर्वाद द्या–गणेश सावंत
माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांच्यापासून ते त्यांच्या तिसर्या पिढीपर्यंत प्रत्येक सदस्यांनी गेवराई तालुक्याच्या विकासासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. विरोधकांनी त्यांचा नकारात्मक प्रचार करून या परिवार ला बदनाम करण्याचे पाप केले. याचा बदला आपल्याला घ्यायचा आहे.
या समारंभात दादासाहेब खिंडकर, संकेत कुलकर्णी, राजेंद्र काळे यांनीही भाषण करुन विजयसिंह पंडित यांना विजयी करण्याचे आवाहन केले.स्नेह मिलन मेळाव्याला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. महिला आणि पुरुषांची संख्या उल्लेखनीय होती. यावेळी सौ. विजेता विजयसिंह पंडित, सौ. श्रावणी पृथ्वीराज पंडित, सौ. शितलताई धोंडरे, सरपंच शितल साखरे, राष्ट्रवादी काँग्रेस रोजगार व स्वयंरोजगार सेलचे विजय पोकळे सतीश सोळंके, पंचायत समिती सदस्य परमेश्वर खरात, सचिन येवले शरद कुरुंद, किशोर चव्हाण, शरद तौर, विकास व्यवहारे, मिलिंद करमाळकर, राजेंद्र डावकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धनगर समाज संघर्ष समितीचा विजयसिंह पंडित यांना पाठिंबा
कार्यक्रमात धनगर समाज संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य चे युवक जिल्हाध्यक्ष ड. विजय तांदळे यांनी विजयसिंह पंडित यांना पाठिंब्याचे पत्र दिले. यावेळी बोलताना विजय तांदळे म्हणाले की, शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्या विजयसिंह पंडित यांना प्रचंड मताने विजय करण्यासाठी धनगर समाज संघर्ष समिती जीवाचे रान करेल. समाजात चांगले काम करणार्या माणसाच्या पाठीशी आपण उभे राहणे ही आपली जबाबदारी आहे. आपण सर्वांनी विजयसिंह पंडित यांना आशीर्वाद द्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.