गेवराई (रिपोर्टर): काय करायचे आणि काय नाही करायचं याबाबत संभ्रम निर्माण केले जात आहेत, पण आता कोणताही संभ्रम नकोय, ज्याला पाडायचे आहे त्याला पाडा ज्याला निवडून आणायचे आहे त्याला निवडून आणा पण ज्यांनी मराठ्यांना आरक्षणामुळे त्रास दिला त्यांना मात्र सोडू नका, त्यांना आपली ताकद एकजूट होऊन मतदानातून दाखवून द्या असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केले. जरांगे पाटील यांनी आंतरवली सराटीत पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, संभ्रम आहे असे सांगितले जात आहे. संभ्रम नकोच. काय करायचे आणि काय नाही करायचं याबाबत संभ्रम निर्माण केले जात आहेत. तुमच्या हिताचा निर्णय तुम्ही घ्या कोणाला पाडायचे असेल त्याला पाडा. आमचे काही उमेदवार निवडणुकीला उभे आहेत पण ते देखील आरक्षणाची लढाई लढत आहेत. मराठा आरक्षणाला पाठिंबा देणार्या उमेदवाराचे गावा गावात मराठ्यांनी व्हिडीओ घ्यावेत. त्याच्याकडून लिहून घेण्यापेक्षा व्हिडिओ घ्यावेत असे आवाहन जरांगे पाटील यांने केले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, मी राज्यभरात कोणालाही पाठिंबा दिलेला नाही, आपल्या मताशी सहमत असलेल्या उमेदवाराला मत द्या, आपली मते वाया गेली नाही पाहिजेत. मी कोणताही पक्ष सांगितलेला नाही. मराठ्यांना चांगलं माहिती आहे, मराठा समाज सुज्ञ आहे. मत कोणाला द्यायचे हे समाजाला सांगायची गरज नाही.
सरकार कोणतेही आले तरी मराठ्यांना आरक्षणासाठी लढायचं आहे. इथून पुढे मला आरक्षणासाठी काम करायचे आहे. लाखो मराठा बांधवांवर केसेसे झाल्या, शेकडो तरुणांनी बलिदान दिले, त्यामुळे ज्यांनी आपल्या लेकराबाळांचा घास हिसकावून घेतला त्यांना सोडायचे नाही. मराठ्यांनी एकजूट होऊन मतदान करायचे, असे जरांगे पाटील म्हणाले.