अंबाजोगाई (रिपोर्टर): अंबाजोगाई तालुक्यातल्या पुस जळगाव, मागेगाव, ममदापूर, पाटोदा शिवारामध्ये बिबट्याने उच्छाद् मांडला आहे. गेल्या दोन दिवसांच्या कालखंडात या भागातील शेतकर्याची एक शेळी व एक बैल या बिबट्याच्या हल्ल्यात शिकार झाले आहेत. बिबट्याच्या वावराने शेतकर्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून संबंधित बिबट्यास तात्काळ जेरबंद करण्याची मागणी होत आहे. त्यानुसार वनविभागही या परिसरामध्ये बिबट्याचा शोध घेत असल्याचे सांगण्यात येते.
अंबाजोगाई तालुक्यातील पुस आणि जळगाव या भागात गेल्या दोन दिवसांपूर्वी एका बिबट्याने उच्छाद् मांडला. त्या भागातील एका शेतकर्याच्या शेळीचा त्याने फळशा पाडला. काल पुन्हा हा बिबट्या, मागेगाव, ममदापूर आणि पाटोदा शिवारामध्ये शेतकर्याच्या नजरेस पडला. त्यघामुळे या भागातील शेतकरी भयभीत झाले आहेत. सध्या शेतातील पिकांना पाणी दिले जात आहे. त्याचबरोबर या भागात मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड सुरू आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर या भागातील शेतांमध्ये शेतकरी आणि मजूर कामावर असतात. काल हा बिबट्या मागेगाव शिवारात शेती असलेले रवि देशमुख यांच्या शेतात आला. या ठिकाणी उसाची लागवड सुरू आहे. एका लिंबाला देशमुख यांचे दोन बैल बांधण्यात आलेले होते. त्यापैकी एका बैलावर बिबट्याने हल्ला चढवत त्याची शिकार केली. या घटनेनंतर शेतकर्यात अधिक भीती निर्माण झाली आहे. सदरील बिबट्यास जेरबंद करावे, अशी मागणी शेतकर्यातून होत असून वनविभागही या परिसरामध्ये बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात येते.