कामामध्ये तफावत, मजुरांची संख्या वाढवण्यात आली
बीड (रिपोर्टर): महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरामध्ये रोजगार हमी योजना राबवण्यात येते. राज्यातल्या अनेक जिल्ह्यात या योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात अपहार होत आहेत. तीच ती कामे दाखवून गुत्तेदार मंडळी शासनाच्या पैशांची लूट करत आहेत. सप्टेंबर महिन्यात रोहयोच्या कामांची पाहणी करण्यात आली होती. त्यामध्ये बर्याच तफावती आढळून आलेल्या आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील रोहयोच्या कामांची पुन्हा चौकशी होणार आहे.
रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक सिंचन विहिरी, शेततलाव, यासह इतर कामे केली जातात. मराठवाड्यातील काही जिल्ह्यात रोहयोच्या कामांचा बोगसपणा वेळोवेळी समोर आलेला आहे. गाव पातळीवरची गुत्तेदार मंडळी बोगस कामे करून स्वत:चे खिसे भरण्याचे काम करत असतात. सप्टेंबर महिन्यात मराठवाड्यातील कामांच्या चौकशीसाठी एक पथक आले होते. त्या पथकाने काही कामांची पाहणी करून त्याचा अहवाल शासनाकडे पाठविला होता. मात्र मजुरांची वाढलेली संख्या, पुन्हा तीच ती कामे दाखवण्याचा प्रकार समोर आलेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा रोहयोच्या कामांची चौकशी होणार आहे. रोजगार हमी योजना ही मजुरांच्या आणि गावांच्या हिताची असली तरी त्यामध्ये गुत्तेदार आणि अधिकार्यांनी संगनमत करून योजनेचा पैसा मोठ्या प्रमाणात लुटल्याचे दिसून येत आहे. काही गावात तेच ते रस्ते दाखवून शासनाच्या पैशाची लूट करण्यात आली. जितके मजूर कामावर दाखवण्यात आलेले आहेत तितके खरे मजूर नाहीयेत. काही मजूर आपल्या जवळचे आहेत तर काही आपल्या कुटुंबातील आहेत. त्यामुळे मजुरांची चौकशी करणे गरजेचे आहे.