अंबाजोगाई (रिपोर्टर): अंबाजोगाई शहराकडून लातूरच्या दिशेने निघालेल्या स्विफ्ट डिझायर कारची आणि लातूरहून येणार्या ट्रकची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. सदरचा अपघात आज सकाळी सातच्या सुमारास लातूर रोडवरील वाघाळा पाटीजवळ घडला. यातील मयत आणि जखमी हे रेणापूर तालुक्यातील कारेपूर येथील असल्याचे सांगण्यात येते.
याबाबत अधिक असे की, रेणापूर तालुक्यातील कारेपूर येथील सहा जण आज सकाळी स्विफ्ट डिझायर (क्र. एम.एच. 14 एल.एल. 6749) या टुरिस्ट गाडीतून लातूरच्या दिशेने निघाले होते. त्यांची गाडी लातूर रोडवरील वाघाळा पाटीनजीक आली असता समोरून लातूरहून येणार्या ट्रकची आणि कारची धडक झाली. या भीषण अपघातात कार चक्काचूर झाल्याचे पहावयास मिळते. तर चौघे जण जागीच ठार झाले. यामध्ये फारुक शेख, दीपक सावरे, बालाजी माने, ऋषिकेश गायकवाड यांचा समावेश आहे तर शेख अमीन, मुबारक शेख हे जखमी झाले आहेत. जखमींना अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. हा अपघात घडल्यानंतर लातूर रोडवरील चारपदरी रोडचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी मुंदडा यांना सहा महिन्यात रस्ता चारपदरी करतो, असे आश्वासन दिले. सदरचा रस्ता हा लवकरात लवकर चार महिन्यात व्हावा, अशी मागणी आता होत आहे.