शुक्रवारीच पोलिसांनी त्यांना पायबंद केले असते तर ही घटना घडली नसती
मस्साजोग (रिपोर्टर): केज पोलिसांनी शुक्रवारीच मारेकर्यांचा पायबंद केला असता तर ही घटना घडलीच नसती. केज ठाण्यामध्ये पोलीसच आहेत का? यावर शंका येते. इथे सत्यमेव जयते नव्हेत र असत्यमेव जयते चालू आहे. वॉचमनची फिर्याद घेतली जात नाही, पवनचक्कीच्या कर्मचार्याने तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल होत नाही. केज पोलीस ठाणे हा गुंडांचा अड्डा बनलाय, असं म्हणत सर्व आरोपींना तात्काळ अटक करा आणि त्याच्या मागचा आखा कोण? तोही शोधा, त्याचबरोबर केज पोलीस ठाण्यातले पीआय महाजन, पीएसआय पाटील, येथील पोलीस बनसोडे आणि या भागाच्या बिट अमलदारावर थेट बडतर्फीची कारवाई करा, अशी मागणी आष्टी-पाटोदा मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केली.
ते आज मस्साजोग येथे आले होते. सुरेश धस यांनी आज सकाळी सरपंच स्व. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले. या वेळी धस म्हणाले की, या पवनचक्कीवाल्याचा ताप माझ्याकडेही होता. दलालांचा यामध्ये मोठा हस्तक्षेप असायचा, शेतकर्यांकडून दोन लाखात जमीन घ्यायची आणि ती कंपनीला 10 लाखांना विकायची हा दलालांचा धंदा होता. मात्र मी कंपनीवाल्यांना म्हटलं, थेट शेतकर्यांना भेटा आणि सर्वच शेतकर्यांना एकच भाव द्या, तेव्हा तिथली कटकट बंद झाली, आता माझ्या मतदारसंघात पाटोदा तालुक्यात ही कटकट वाढली. तिथेही बाहेरून हस्तक्षेप केला जातोय. हस्तक्षेप करणार्यांना राजकीय पाठबळ असल्याचा आरोप करत संतोष देशमुख यांची हत्या केवळ पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे झाली. घयना घडण्याच्या दोन दिवसअगोदर पवनचक्कीच्या कार्यालयात जो वाद झाला तेव्हाच केज पोलिसांनी यातील आरोपींवर कारवाई करायला हवी होती मात्र पोलिसांनी वॉचमनची फिर्याद घेतली नाही, तेथील कर्मचार्यांची फिर्याद घेतली नाही, त्यावरून केज पोलीस ठाणे गुंडांचा अड्डा बनला आहे. शुक्रवारी पोलिसांनी त्या लोकांचा पायबंद केला असता तर आज ही घटना घडली नसती. संतोष देशमुख यांच्या अंगावर एक इंचही जागा शिल्लक नाही, जिथे मार नाही. त्यांच्या छातीवर एकाने तीन उड्या मारल्या, तेव्हाच ते गतप्राण झाले, अशी माहिती आपल्याला मिळाल्याचे त्यांनी म्हटले. सुरेश धसांनी आक्रमक होत केज पोलीस ठाण्याचे पीआय महाजन, पीएसआय पाटील, पोलीस बनसोडे आणि या भागाचा बिट अंमलदार तात्काळ बडतर्फ करण्याची मागणी केली. आतापर्यंत तीन आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उर्वरित चार आरोपी पोलीस अटक करतील, परंतु यांचा आखा कोण? तोही शोधा. असं म्हणत या प्रकरणी आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन सविस्तर मागणी करणार असल्याचे सुरेश धसांनी म्हटले.