मस्साजोग (रिपोर्टर): मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येने महाराष्ट्राला हादरवून सोडले आहे. गेल्या बारा दिवसांपासून उभा महाराष्ट्र यातील आरोपींना तात्काळ अटक करा, अशी मागणी करतोय. आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट मस्साजोग गाठले. तेथे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यांच्या आईचे सांत्वन केले. या वेळी कुटुंबियाने आम्हाला काही नको, आरोपींना तात्काळ अटक करा व त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई करा, अशी मागणी केली. या वेळी शरद पवार यांनी उपस्थित गावकर्यांशी संवाद साधला, त्यावेळी पवार म्हणाले, कितीही मदत केली तरी माणूस परत येत नसतो, या कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी मी स्वत: घेतो. आता या दहशतीच्या वातावरणातून बाहेर पडा, दहशतीच्या या वातावरणाला आपण एकत्रित येऊन तोंड देऊ. जेव्हा हे प्रकरण संसदेत मांडलं गेलं, घटनाक्रम ऐकून अवघी संसद गंभीर झाली. आता राज्य आणि केंद्र सरकारने या प्रकरणात जे कोणी जबाबदार असतील, जे कोणी सुत्रधार असतील त्यांना योग्य प्रकारे धडा शिकवावा.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार हे आज मस्साजोग येथील देशमुख कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी गेले होते. या वेळी कुटुंबीयांना धीर देत या प्रकरणात योग्य तपासासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पवारांसमोर कुटुंबियांनी आक्रोश मांडला. संतोष देशमुख यांच्या बहीण यांनी शरद पवारांसमोर आक्रोश करत ज्या प्रकारे माझ्या भावाची हत्या केली तसा न्याय आम्हाला हवा, बाकी आम्हाला काही नको, या शब्दात देशमुख कुटुंबियांच्या वेदना बहिणीने मांडल्या. या घटनेने महिलांपासून ते पुरुषांपर्यंत सर्वच भयभीत असल्याचे सांगितले. कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतल्यानंतर शरद पवार हे उपस्थित गावकर्यांशी संवाद साधत होते. या वेळी संतोष यांच्या लहानग्या मुलीने माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या, मुख्य सुत्रधाराला लवकरात लवकर अटक करा, अशी मागणी केली. या वेळी बोलताना पवार म्हणाले, या प्रचंड गंभीर घटनेची नोंद राज्य आणि केंद्र सरकारला घ्यावी लागेल. महाराष्ट्रातील खासदारांनी जेव्हा हा प्रश्न दिल्लीतील संसदेत मांडला, बीडच्या खासदारांसह अन्य खासदार जेव्हा या प्रश्नी संसदेत बोलत होते, तेव्हा हे हत्याकांड ऐकून पुर्ण संसद गंभीर झाली होती. या देशाच्या राज्यामध्ये नेमके काय चालले आहे, असा सवाल त्यांनी या वेळी उपस्थित केला. या प्रकरणात आरोपींचा सुसंवाद कोणासोबत झाला, त्याची माहिती काढा, भ्रमणध्वनी, टेलीफोन किंवा अन्य साधनातून संपर्क झाला का? ते शोधा. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी काल भाष्य केले, देशमुख कुटुंबियांना मदतही केली, मी त्यावर बोलणार नाही, मदत जरी झालेली असेल तर गेलेला माणूस परत येत नाही. या प्रकरणात जे कोणी जबाबदार असतील त्यांना तात्काळ जेरबंद करा आणि तुम्ही सर्व या दहशतीच्या वातावरणातून बाहेर पडा. दहशतीच्या वातावरणाला आपण एकत्रित तोंड देऊ. आता सरकारने सुत्रधाराला योग्य प्रकारे तातडीने धडा शिकवावा. संतोष यांच्या मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी मी घेत आहे. राज्य आणि केंद्र सरकार या प्रकरणी खोलात जाईल, अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली.