बीड (रिपोर्टर):-दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल अखेर वाजलं आहे. येत्या 5 फेब्रुवारीला मतदान होणार असून या मतदानची मतमोजणी 8 फेब्रुवारीला होणार आहे आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी आज पत्रकार परिषद घेत या संदर्भातली माहिती दिली आहे. दरम्यान राज्यातील ईव्हीएमवरील आरोंपानाही निवडणूक आयोगाने उत्तर देत सर्व आरोप खोडून काढले आहे.
देशाच्या अनेक राज्यात नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये अनेक रेकॉर्ड तयार झाले. अनेक नवतरुणांनी लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभाग नोंदवला. आगामी काळात देखील लोकशाही मजबूत करण्यासाठी ही टक्केवारी अधिक वाढत जाईल. किंबहुना प्रत्येक निवडणुकीनंतर ईव्हीएमवर आरोप होतच राहतात. कुठल्याही यंत्रणेनं ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही. यंत्रणात चूक असेल, वैयक्तिक चूक असेल तर दाखवा, तत्काळ कारवाई करू. असेही केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी म्हटले आहे.
ईव्हीएम संदर्भातील आरोपांवर बोलतांना राजीव कुमार म्हणाले की, ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही, असे कोर्टानेही म्हटले आहे. त्यामुळे वायरस किंवा इतर यंत्रणांनी ईव्हीएम हॅक होऊ शकतो हा दावा पूर्णतः खोटा असल्याचे सांगत राजीव कुमार यांनी राज्यातील निवडणुकांवरील आरोपांवर उत्तर दिले आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषद मध्ये ते बोलत होते.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम खालीलप्रमाणे:
विधानसभा निवडणुकीची अधिसूचना कधी निघणार?- 10 जानेवारी
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख- 17 जानेवारी
उमेदवारी अर्ज छाननी करण्याची तारीख- 18 जानेवारी
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख- 20 जानेवारी
मतदानाची तारीख- 5 फेब्रुवारी
निकालाची तारीख- 8 फेब्रुवारी
1 कोटी 55 लाख मतदार ठरवणार दिल्लीचा कारभारी
दिल्ली विधानसभेच्या एकूण 70 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने (आप) भाजप आणि काँग्रेसला धोबीपछाड दिला होता. या निवडणुकीत ‘आप’ने 70 पैकी 62 जागांवर विजय मिळाला होता. तर भाजपला अवघ्या 8 जागांवर विजय मिळाला होता. गेल्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये ‘आप’ने दिल्लीत वर्चस्व राखले होते. मात्र, गेल्या पाच वर्षांमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मनिष सिसोदिया यांच्यासह ‘आप’च्या प्रमुख नेत्यांवर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे पक्षाची प्रतिमा काही प्रमाणात डळमळीत झाली आहे. याशिवाय, सलग 10 वर्षे सत्तेत असल्यामुळे सत्ताधारी’आप’ विरोधात अँटी-इन्कम्बन्सी फॅक्टर निर्माण झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
अरविंद केजरीवाल नेहमीप्रमाणे लोकप्रिय घोषणा करुन दिल्लीची सत्ता राखणार की भाजप ‘आप’ची राजवट उलटवण्यात यशस्वी ठरणार, हे पाहावे लागेल. दिल्लीत बहुमतासाठी 36 ही मॅजिक फिगर आहे. यंदा दिल्ली आप, काँग्रेस आणि भाजप अशी तिरंगी लढत होण्याची चिन्हं दिसत आहेत. काँग्रेस आणि ‘आप’चा मतदारवर्ग एकच असल्याने मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेस दिल्लीत किती जागा लढवणार आणि त्याचा आपला किती फटका बसणार, या समीकरणांवर भाजप लक्ष ठेवून आहे.