राजकारणाचे तिनतेरा करा परंतु माणसाला माणूस म्हणून राहू द्या
बीड (रिपोर्टर): मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर राजकारण होतय, अशा स्थितीत या प्रकरणाचे राजकारण करणार्या पुढार्यांना बहुजन विकास मोर्चाने आज लक्ष्य केलं. बहुजन विकास मोर्चाचे बाबुराव पोटभरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये जाहीर इशारा देत ‘त्या’ तिघांच्या बुडाखाली किती अंधार आहे हे उभ्या जिल्ह्याला माहित आहे. खा. बजरंग सोनवणे स्वत:ला धुतल्या तांदळासारखे समजतात, मात्र ते कसे आहेत हे आम्हालाच नाही तर उभ्या जिल्ह्याला माहित आहे. या तिन आमदारांसह खासदारांनी राजकारणाचे तिनतेरा करावेत, मात्र बीड जिल्ह्यातल्या माणसाला माणूस म्हणून जगू द्यावं, जातीवादाचे विष पसरवणे बंद करावे, नसता आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल आणि ही नौटंकी बंद करावी लागेल, असा थेट इशारा बाबुराव पोटभरे यांनी दिला.
ते बीड येथे पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. या वेळी त्यांच्या सोबत मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे संचालक शेख तय्यब, माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती श्रीहरी मोरे, नगरसेवक सचीन डोंगरे, बहुजन विकास मोर्चाचे नवनाथ धाईजे आदी उपस्थित होते.
बीड जिल्ह्यातले हे तिन-चार टगे जसे काही जिल्ह्याला बदनाम करण्याचा ठेका घेतलाय, या तोर्यात बोलत बीड जिल्ह्यामध्ये जातीवाद पसरवत आहेत. वातावरण दूषित करत आहेत. यांनी हे धंदे बंद केले नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल, असा थेट इशाराच बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक बाबूराव पोटभरे यांनी दिला. ते पुढे म्हणाले, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यात जे राजकारण सुरू झाले आहे आणि मयत देशमुखांच्या हत्येचा इव्हंट साजरा करतायत, त्याअनुषंगाने बाबुराव पोटभरे बोलत होते. संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या झाली. यातील दोषींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, अशी आमचीही मागणी आहे. मात्र त्यांच्या मृत्यूनंतर जिल्ह्यातील तीन आमदारांनी संतोष देशमुखांच्या हत्येची घटना गांभीर्याने न घेता उठसूठ देशमुखांच्या हत्येचा इव्हेंट साजरा करतायत. टीव्ही चॅनल आणि माध्यमात येत आहेत आणि मजाक करतात. त्यांच्यासाठी माझा हा सज्जड दम आहे. जिल्ह्यातील सर्वच राजकारणी हे कुठे ना कुठे अडकलेले आहेत. त्यामुळे स्वत:ला मंत्रीपद मिळाले नाही म्हणून दुसर्याचे मंत्रीपद घालण्यासाठी संतोष देशमुख यांच्या हत्येचा उपयोग करून घेऊ नये. ते कसे आहेत हे आम्हाला गेल्या तीस वर्षांपासून माहित आहे. आष्टीचे कसे आहेत तेही जनतेला माहित आहे. त्यांनी तर कहरच केला आहे, ते वेगवेगळ्या माध्यमासमोर अंगविक्षेप करून मनोजरंजनाचं साधन देशमुखांच्या हत्येला बनवलं आहे. आणि बीडचे कसे आहेत हे जगाला सांगायची गरज नाही. त्यामुळे बीड जिल्ह्यातील जो जातीवाद यांनी फोपावला आहे त्यातून सामान्य माणसाचे जगणे कठीण झाले आहे, सामान्य माणसाला जातीवाद नको आहे, त्यांना त्यांचं जीवन जगायचं आहे. त्यामुळे या सर्व घटना तात्काळ बंद नाही झाल्यातर आम्ही रस्त्यावर उतरून धडा शिकवू, असाही इशारा बाबू पोटभरे यांनी दिला आहे. या पत्रकार परिषदेला माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती श्रीहरी मोरे, नगरसेवक सचीन डोंगरे, बहुजन विकास मोर्चाचे नवनाथ धाईजे आदी उपस्थित होते.