बीड (ठिकठिकाणच्या रिपोर्टरकडून): मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा व्हावी यामागणीसाठी परभणी येथे आयोजीत मोर्चामधून दोन समाजात तेढ निर्माण होईल, अशा आशयाचे वक्तव्ये आणि एका जातीबद्दल द्वेष व्यक्त केल्याच्या निषेधार्थ बीड जिल्ह्यात काल दुपारपासून वंजारा समाज बांधवांनी पोलीस ठाण्यात मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी ठिय्या मांडला. पहिला गुन्हा परळी आणि बीड शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर रात्री उशिरा शिवाजीनगर पोलीस ठाण्यासह केज, वडवणी, अंबाजोगाई या पोलीस ठाण्यातही मनोज जरांगे यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परळी आणि बीड शहर पोलिसात काल सायंकाळी गुन्हे दाखल झाले. शिवाजीनगर पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर महिला-पुरुषांनी ठिय्या मांडत घोषणाबाजी केली. पहाटे तीन वाजेपर्यंत गुन्हा दाखल करण्यासाठी लोक पोलीस ठाण्यात तळ ठोकून होते. सरशेवटी शिवाजीनगर पोलीस ठाण्यातही मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर इकडे केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी रात्री पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणावर लोकांनी गर्दी केली. मात्र रात्री पोलिसांनी गुन्हा दाखल न करता लोकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. आज सकाळी पुन्हा मोठ्या प्रमाणावर लोक ठाण्यात गेले आणि गुन्हा दाखल होत नाहीतोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळे केज पोलिसातही गुन्हा दाखल करण्यात आला. अंबाजोगाई येथेही जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.










