बीड (रिपोर्टर): उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना) गटाच्या बीड जिल्हाप्रमुख पदावरून परमेश्वर सातपुते यांची कार्यमुक्ती करत त्यांच्या जागी उल्हास गिराम पाटील यांची प्रभारी नियुक्ती करण्यात आली. तशा आशयाची अधिकृत निवड ही ठाकरे सेनेच्या मुखपत्र असलेल्या ‘सामना’ दैनिकातून वृत्त देून करण्यात आली आहे. सातपुते यांनी दोन दिवसांपूर्वी एक पत्रकार परिषद घेतली होती. कार्यमुक्त झाल्यानंतर सातपुते यांनी एका पोस्टद्वारे आपण शिवसैनिक म्हणून काम करणार असल्याचे म्हटले आहे.
बीड जिल्ह्यात सर्वच पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्थिरता पहावयास मिळत आहे. कुठल्या ना कुठल्या कारणावरून राजकीय वाद उफळून येत आहे. सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या मारहाणीच्या व्हिडिओ प्रकरणात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेमध्ये पंडितांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला. पाठोपाठ आज सकाळी सातपुते यांना पदावरून काढण्यात आल्याचे प्रभारी नियुक्तीच्या बातमीवरून समोर आले. शिवसेनेचे कडवे समर्थक उल्हास गिराम पाटील यांना जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. उल्हास गिराम पाटील यांच्याकडे गेवराई, आष्टी हे दोन मतदारसंघ देण्यात आले आहे तर दुसरे जिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांच्याकडे बीड, माजलगाव तर तिसरे जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे यांच्याकडे केज, परळी विधानसभा मतदारसंघाचे कार्यक्षेत्र असणार आहे.
परमेश्वर सातपुते यांनी सोशल मिडियावर लिहिलेल्या पोस्टमध्ये ‘आतापर्यंत पक्षाने जी जबाबदारी ती आपण पार पाडली, यापुढे शिवसैनिक म्हणून काम करणार आहे’ असे म्हटले आहे.