वाढते ऊन्ह आणि अतिरिक्त उपस्यामुळे तळे रिकामे होऊ लागले
पाण्याचे नियोजन करणे गरजेचे
बीड, (रिपोर्टर) ः बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात यावर्षी चांगला पाऊस पडला होता. त्यामुळे 90 टक्के तलावे भरली होती. तलाव भरल्यामुळे शेतीसाठी मुबलक पाणी झाले. रब्बीचा हंगाम संपत येत आहे. आतापर्यंत तलावातील पाणी पिकासाठी वापरण्यात आले. येथून पुढे तलावातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवणे गरजेचे आहे. ज्या तलावात 30 टक्क्यांच्या आत पाणी आहे त्या तलावातील पाणी उपस्यावर प्रतिबंध लावणे गरजेचे आहे. वाढते ऊन्ह आणि अतिरिक्त उपस्यामुळे तलावे रिकामे होऊ लागले आहेत. मराठवाड्यातील तलावात 40 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे. चांगला पाऊस पडेपर्यंत पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे.
गेल्या वर्षी दुष्काळी परिस्थिती होती. त्यामुळे मराठवाड्यात पाणी टंचाई होती. यंदा मात्र चांगला पाऊस पडल्याने राज्यातील 90 टक्के तलावे पूर्ण भरली होती. छोट्या-मोठ्या तलावातून शेतीसाठी पाण्याचा उपयोग करण्यात आला. पाण्यामुळे रब्बी पिके जोमात आली. रब्बी पिकांची कापणी होत आली आहे. उन्हाळी पिके शक्यतो जास्त प्रमाणात नसतात. मात्र, बहुतांश ठिकाणी तलावातील पाण्याचा बेसुमार उपसा होऊ लागला. उपस्याबाबत प्रशासनाचं तितकं नियंत्रण नाही. पाण्याचा योग्य पद्धतीने वापर करणे गरजेचे आहे. वाढत्या उन्हामुळे झपाट्याने पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. जिल्ह्यातील अनेक धरणांनी तळ गाठला. काही धरणांमध्ये 40 टक्क्यांच्या खाली पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे. हे पाणी आगामी काळासाठी पिण्यासाठी राखीव ठेवायला हवे. जेणेकरून पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ येणार नाही.