परळी (रिपोर्टर): येथील परळीऔष्णिक विद्युतनिर्मिती केंद्रात पूर्वी एक ते आठ वीजनिर्मिती केंद्रे सुरू होती. मात्र, कालमान संपल्याने एक ते पाच वीजनिर्मिती संच बंद करून भंगारात काढण्यात आल्याने व त्या जागेवर नवीन परळी औष्णिक विद्युत वीजनिर्मिती केंद्र किंवा विस्तारित वीजनिर्मिती केंद्र सुरू न झाल्याने येथील वीजनिर्मिती अर्धावर आली आहे. एकेकाळी या वीजनिर्मिती केंद्रातून 1420 मेगावॉट वीजनिर्मिती केली जात असे. यासाठी मंजूर असलेला संच क्रमांक 9 सुरू होणे आवश्यक आहे. यासाठी शासन स्तरावर प्रयत्नांची आवश्यकता आहे.
सुरवातीला परळीत विद्युतनिर्मिती केंद्रात 30 मेगावॉटचे दोन संच उभारण्यात आले. या संचांद्वारे निर्माण होणारी वीज संपूर्ण राज्यात पाठविली
जाते. राज्यातील वाढती विजेची मागणी व मराठवाड्याच्या विकास लक्षात घेत 210 मेगावॉट संचाची उभारणी, विस्तारित योजना म्हणून 1977मध्ये मंजूर करण्यात आली. 210 मेगावॉट साखळीतील संच क्रर्माक 3, 4, 5 हे 1980, 1985, 1987 ला कार्यान्वित करण्यात आले. यामुळे येथील औष्णिक विद्युतनिर्मिती केंद्राची वीजनिर्मितीची स्थापित क्षमता 690 मेगावॉट झाली. संच 3, 4, 5 द्वारे निर्माण होणारी वीज 220 किलो व्होल्ट विद्युत वाहिनीद्वारे गिरवली येथील राज्य विद्युत वाहिनींना मिळते. येथून संपूर्ण राज्यात वीज वितरित केली जाते. पुन्हा वाढत्या विजेची मागणी लक्षात घेऊन 250 मेगावॉटचे तीन संच क्रमांक 6, 7, 8 येथे मंजूर करण्यात आले. ते 2007व 2010 ला कार्यान्वित झाले. यामुळे येथील औष्णिक विद्युतनिर्मिती केंद्राची स्थापित क्षमता 1420 मेगावॉट झाली
व राज्यात वीजनिर्मिती करण्यात परळी दुसर्या क्रमांकावर आले.
येथील औष्णिक विद्युतनिर्मिती केंद्रात सध्या संच क्रमांक 6, 7, 8 हे कार्यान्वित आहेत. या तीन संचांतून 750 मेगावॉट वीजनिर्मिती केली जाते. येथील संच क्रमांक 1 ते 5 बंद करून स्क्रॅपमध्ये काढण्यात आले आहेत. 2007 मध्ये औष्णिक विद्युत केंद्र संच 8व9 साठी 128 हेक्टर जमीन संपादित केलेली आहे. यातील संच क्रमांक 8 चे काम पूर्ण होऊन 2016 मध्ये कार्यान्वित करण्यात आलेला आहे. परंतु, संच क्र. 9 चे काम अद्याप सुरू झालेले नाही. हा संच सुरू झाल्यास परळीतील अनेक बेरोजगार तरुणांना कायमस्वरूपी रोजगार मिळू शकतो.