मुंबई (रिपोर्टर): विधान परिषदेच्या पाच जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर भाजपाने आपल्या तीन उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आज-उद्या एका ुमेदवाराची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे तर दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून बीड जिल्ह्यातील संजय दौंड यांना कागदपत्र तयार ठेवण्याबाबत सांगण्यात आले आहे. तर झिशान सिद्दीकी, उमेश पाटील हे दोघेही रेसमध्ये अहोत. संजय दौंड यांना राष्ट्रवादीने पुन्हा संधी दिली तर बीडसाठी आणखी एक आमदार वाढणार आहे.
विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणुका होत असून महायुतीतील भाजपा, शिंदे सेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जागा वाटप झाले आहेत. भाजपासाठी तीन व शिवसेना, राष्ट्रवादीसाठी प्रत्येकी एक जागा सोडण्यात आली आहे. भाजपाकडून या वेळेस पुन्हा एकदा माधव भंडारी यांना दुर्लक्षित करून दादाराव केचे, संजय केणेकर आणि संदीप जोशी यांना संधी देण्यात आली आहे. या तिन्ही नेत्यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भाजपाने तब्बल 20 लोकांची यादी दिल्लीत पाठवल्याचे सांगण्यात आले मात्र उमेदवारांच्या नावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच या निवडणुकीवर प्रभाव असल्याचे दिसून येते. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी इच्छुकांची यादी पाहता सावध भूमिका घेतली आहे. त्यांनी अद्याप आपल्या उमेदवाराची घोषणा केलेली नाही. तर राष्ट्रवादीकडून झिशान सिद्दीकी, संजय दौंड, उमेश पाटील या तिघांना कागदपत्र जमा करण्याबाबत सांगण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये संजय दौंड हे वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत होते. मात्र नंतर पक्षाने त्यांची समजूत काढली होती. दौंड हे या आधीही एक वर्षासाठी विधान परिषदेवर आमदार म्हणून गेलेले होते. आता पुन्हा अजित पवारांनी त्यांना संधी दिली तर बीडसाठी एक आमदार वाढणार आहे.