बीड जिल्ह्यातले व्यवसायिक, विद्यार्थी सुखावले
बीड (रिपोर्टर): जेव्हा कर्तव्य-कर्माला अनन्यसाधारण महत्व दिलं जातं तेव्हा सर्वसामान्यातील सर्वसामान्य माणसाचे काम नक्की होते. मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे संचालक पदावर वर्णी लागल्यानंतर मराठवाडाच नव्हेतर राज्यभर दौरा करून महामंडळाचा उद्देश आणि हेतू पुर्णत्वाकडे नेणारे सायं. दैनिक बीड रिपोर्टरचे संपादक तथा महामंडळाचे संचालक शेख तय्यब यांनी अवघ्या चार महिन्यांच्या कालखंडात 150 व्यवसायिक आणि 22 शैक्षणिक कर्ज मंजूर करत या सर्वसामान्य लाभधारकांना 5 कोटी 92 लाखांच्या आसपास कर्जवाटप केले. यामुळे अनेक व्यवसायिकांचे व्यवसाय वाढणार आहे तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी दूर होणार आहेत. यामध्ये चार विदेशात शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत.
गेल्या चार महिन्यांपूर्वी सायं. दैनिक बीड रिपोर्टरचे संपादक शेख तय्यब यांची मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या संचालकपदी वर्णी लागली. पहिल्या दोन महिन्यातच मराठवाड्यासह राज्यभरात दौरे करून महामंडळाचा उद्देश आणि हेतू सर्वांसमोर मांडला. शैक्षणिक कर्ज विद्यार्थ्यांना मिळावेत यासाठी बैठकीत वेळोवेळी चर्चा केली. बीड जिल्ह्यात महामंडळाच्या वतीने मुदत कर्ज योजनेअंतर्गत 150 लाभार्थ्यांना व्यवसाय कर्जापोटी 4 कोटी 80 लाख रुपये मंजूर करून त्या मंजुरीचे पत्र वाटप करण्यात आले. दुसरीकडे शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत 22 लाभार्थी विद्यार्थ्यांना एकूण कर्ज रक्कम 1 कोटी 10 लाख 200 रुपये तर यामध्ये विदेशात शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक विदेशी कर्ज योजनेअंतर्गत 4 लाभार्थ्यांना 82 लाख 50 हजार कर्जाचे मंजुरी पत्र वाटप करण्यात आले आहे.
संचालक शेख तय्यब हे तातडीने कर्जप्रकरणे मंजूर करून व्यावसायिकांसह विद्यार्थ्यांना मोठी मदत करत आहेत. महामंडळाने कर्जाबाबत जी मुदत दिली होती त्या मुदतीच्या आत आलेल्या 200 फाईल अद्याप मंजूर नसल्या तरी त्याही लवकरात लवकर मंजूर होतील असेही संचालक शेख तय्यब व जिल्हा व्यवस्थापक इम्रान कादरी यांनी म्हटले आहे. कर्ज मंजुरी पत्राचे वाटप करते वेळेस जिल्हा व्यवस्थापक इम्रान कादरी, शाहेद पटेल, सय्यद नदीम, सोहेल पटेल, फैय्याज कुरेशी, समीर पटेल आदी उपस्थित होते.
कर्जमंजुरीसाठी कुणाला पैसे देऊ नका,
दलालांपासून दूर रहा
मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत फाईल मंजूर करून देतो, टक्केवारी द्या, पैसे द्या, असे कोणी म्हणत असेल दलाली करत असेल तर त्यांच्यापासून सावध रहा, कोणालाही पैसा देऊ नका, थेट जिल्हा व्यवस्थापक इम्रान कादरी अथवा संचालक शेख तय्यब यांच्याशी संपर्क साधा.
इम्रान कादरींचे शिस्तबद्ध इमान
मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे बीड जिल्हा व्यवस्थापक इम्रान कादरी हे गेल्या कित्येक वर्षांपासून इमाने इतबारे आपले कर्तव्य बजावत आहेत. अल्पसंख्याक समाजातील विघार्थ्यांसह व्यवसायिकांना उभारी कशी देता येईल, त्यांच्या अडीअडचणी दूर कशा होतील याला अधिक महत्व देत महामंडळाच्या वतीने योग्य माणसाची निवड ते सातत्याने करत असतात. त्यांचे काम शिस्तबद्ध आणि नियमात असल्याचे सातत्याने दिसून येते.