माहिती तंत्रज्ञानाच्या आविष्काराने प्रफुल्लीत झालेल्या आजच्या युगात उभं जग 21 व्या शतकाच्या पलिकडे पाहतय, इकडे मात्र उभा महाराष्ट्र जात-पात-धर्म-पंथाच्या कुबड्या घेत सोळाव्या शतकातल्या कबरी खोदण्यात धन्यता मानतो तेव्हा खरचं हा महाराष्ट्र स्वराज्यासाठी आणि स्वातंत्र्यासाठी आपल्या बापाच्या विरुद्ध उभा राहणार्या जिजाऊ मॉ साहेबांचा आहे का? जात-पात-धर्म-पंथापेक्षा स्वराज्य धर्म मानून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवरायांचा हाच तो महाराष्ट्र आहे का? महाराजांनी निर्माण केलेलं स्वराज्य लखलखणार्या तलवारीच्या पात्यावर जपणारे आणि ते वाढवणारे छत्रपती संभाजी महाराजांचा खरचं हा महाराष्ट्र आहे का? जिथं बलात्कार्याला चौरंगा, जिथं भाजीच्या देठालाही हात लावण्याची हिंमत कोणी करत नव्हतं, जिथं माऊलीप्रमाणे मावळा हा शब्द घराघरात होता त्या महाराष्ट्राची आणि तेथील माणसाची आज माहिती तंत्रज्ञानाच्या युगात ज्या हालअपेष्टा होताना दिसतात तेव्हा हे पाप करू पाहणारे नेमके कोण? या प्रश्नाचे उत्तर शोधणे नितांत गरजेचे वाटते. इथे भारतीय वंशाच्या व्यक्तीने पृथ्वी पार झेंडे फडकवले तरी आमचा उर भरून येतो. मात्र इथल्याच मातीत निपजणारे, कर्तृत्व कर्म करू पाहणार्या तरण्याताठ्या पोरांच्या हातात जेव्हा जात-पात-धर्म-पंथाच्या नावाने दगडे आणि जळते टेंभे दिसतात तेव्हा खरचं आपण भविष्याचा वेध घेतोय की, भुतकाळातल्या अंधाराच्या साम्राज्यामध्ये पुन्हा जगू पाहतोय, हेच समजत नाही. आज जेव्हा

सुनीता विल्यम्सची पृथ्वी स्वारी
परतली तेव्हा अखंड हिंदुस्तानानेच नव्हे तर उभ्या जगाने आनंदोत्सव साजरा केला. सुनिता विल्यम्स या भारतीय वंशाच्या आहेत. याआधी त्यांनी अंतराळावर जावून सुरक्षितपणे वापस आल्याचे उभ्या जगाने पाहिले होते. गेल्या नऊ महिन्यांपूर्वी सुनिता विल्यम्ससह अन्य अंतराळवीरांनी अंतराळाकडे झेप घेतली. ते पंधरा दिवसाच्या कालखंडासाठी. मात्र तांत्रिक बिघाडामुळे त्यांना तब्बल 9 महिने 14 दिवस पृथ्वीविरहीत अंतराळावर राहावं लागलं. या कालखंडात त्यांचा अनुभव काय असेल, त्यांनी अंतराळावर काय काय पाहिलं असेल, पृथ्वी आणि तेथील परिस्थिती हवा, पाणी यासह अन्य गोष्टींची इत्यंभूत माहिती त्यांनी जमाही केली असेल हे सांगण्याचा अट्टाहास एवढढ्यासाठीच जग हे 21 व्या शतकाच्या पलिकडे जावून डोकावत आहे, कोणी चंद्रावर जातय, कोणी अंतराळावर जातय, वेगवेगळे शोध घेत आहेत. जगाच्या पाठीवर संघर्ष करणारा, धैर्य ठेवणारे राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पाहिले जाते. या महाराष्ट्राने सोळाव्या शतकात विज्ञानाला अनन्यसाधारण महत्व दिलं. आज त्याच महाराष्ट्रात विज्ञान युगात अज्ञानाला आणि अंधश्रध्देला धर्मांधतेला आणि जातीपातीला अनन्यसाधारण महत्व दिलं जातय, तेव्हा आजच्या राज्यकर्त्यांना माणसात माणूस ठेवायचा नाही, हे स्पष्ट होते. आमच्या पुर्वजांनी जात-पात-धर्म-पंथापेक्षा कर्तृत्व-कर्माला आणि माणूस धर्माला महत्व दिलं. म्हणूनच अनु-रेणू तोडका
तुका आकाशाएवढा
असं म्हटलं जातं. भारताचे तत्कालीन राष्ट्रपती स्व. एपी.जे. अब्दुल कलाम यांच्या कार्यकाळात पोखरणमध्ये अणु चाचणी घेण्यात आली. आश्चर्य पहा सोळाव्या शतकात जगद्गुरू संत तुकोबांनी अणु-रेणुचा सिद्धांत मांडला. याचा अर्थ छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळामध्ये दैववादापेक्षा विज्ञानवादाला अनन्यसाधारण महत्व होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारताना कुठली अंधश्रद्धा पाळली नाही. त्याचं एक ज्वलंत उदाहरण छत्रपती शिवरायांनी उभारलेलं आरमार यातून देता येईल. कारण समुद्र ओलांडून दुसर्या देशी जाणं हे अमंगल, अपवित्र मानलं जायचं. मात्र समुद्रातून येणार्या लुटारुंचा बंदोबस्त करण्यासाठी पहिलं आरमार उभारणारे शिवछत्रपती हे एकमेव राजा ठरले आणि आज त्याच महाराष्ट्रात जात,पात, धर्म, पंथ यावर वाद होतायत, दंगली भडकवल्या जातायत. कबरीच्या नावाने तरण्याताठ्या पोरांची माथी भडकवली जातायत.

छे छे… कोण औरंगजेब?
औरंगजेब तोच जो महाराष्ट्राचे आणि स्वराज्याचे लचके तोडू पाहत होता. त्याच औरंगजेबाच्या दरबारात गिल्लत उधळणारे आपले शिवरायच होते. आगर्यावरून औरंगजेबाच्या तावडीतून सुटून पुन्हा 23 किल्ल्यांच्या ऐवजी 300 किल्ले निर्माण करणारे छत्रपती शिवरायच होते. शिवरायांच्या नंतर लखलखणार्या पात्यावर संभाजी महाराजांनी ज्या पद्धतीने हे स्वराज्य टिकवून ठेवले ते जात-पात-धर्म-पंथाच्या जोरावर नव्हे स्वत:च्या मनगटीच्या ताकतीवर आणि निधर्म स्वराज्य भूमिकेवर ते टिकलं आणि वाढलं. इथं इतिहासातून औरंगजेबाची कुटनीती आणि छत्रपती शिवरायांचे गनिमी कावे अभ्यासासाठी घ्यायला हवे. आजही अखंड हिंदुस्तानापेक्षा जगभरातले बहुतांशी देश छत्रपती शिवरायांची युद्धनीती वापरतायत, आत्ता आत्ता जे युद्ध चालू आहे युक्रेनसारख्या देशातील सैनिकांनी शिवरायांची युद्धनीती वापरल्याचे उभ्या जगाने पाहिले. आम्ही इतिहासाच्या पानातून चांगले घेण्यापेक्षा इतिहासाची पानेच फाडण्याचा अट्टाहस करू पाहतोय आणि या अट्टाहासापाई
बहुजनांच्या पोट्ट्यांचं डोसकं
जातीय विषवल्लीने सडवण्याचा प्रयत्न करतायत. आम्ही अनेक वेळा मोठ्या धाडसाने सांगतो, आणि लिहितोही, जेव्हा केव्हा जातीय दंगली झाल्या असतील, धार्मिक भांडण झाले असेल, जातीयवादातून हाणामार्या झाल्या असतील त्यामध्ये श्रीमंतांची पोरं नसतात, धनिकांची पोरं नसतात, पुढार्यांची-सत्ताधार्यांची अथवा मालदार, अधिकारी यांची लेकरं पहायला मिळत नाहीत, स्वत:ला उच्चभ्रू मानणारे, धर्माचा जयजयकार करणारे, स्वत:ला धर्माचे ठेकेदार म्हणवून घेणारे उच्चवर्णीयांचे लेकरंही यामध्ये कधीच नसतात. जात आणि धर्माच्या नावावर बहुजनांच्या लेकरांना हातात कंडे बांधून ज्या पद्धतीने त्यांच्या मस्तकात जात आणि धर्माची अफू भिनवली जाते आणि त्यातून नरसंहार करण्याहेतू हातात दगडे दिली जातात. केसेस बहुजनांच्या लेकरांवर होतात, हात-पाय तुटला तर बहुजनांच्या लेकरांचा तुटतो, मेलं तरी तो बहुजनाचं लेकरू मरतो, स्वत:ला धर्माचे ठेकेदार म्हणणारे घरात कवाड बंद असतात, त्यांची लेकरं देशात-विदेशात शिक्षण घेत असतात. आता बास्स आम्हाला 21 व्या शतकाच्या पलिकडे पहायचं, सोळाव्या शतकातल्या इतिहासाच्या पानातून छत्रपतींनी ज्याप्रमाणे अंधश्रद्धेला मूठमाती देत आरमार उभा केलं तसं आम्हालाही आम्ही ज्या क्षेत्रात जाऊ तिते शिवाजी होऊ, अशी भूमिका आता बहुजनातल्या प्रत्येक पोराने घ्यायला हवी. कसली औरंगजेबाची कबर आणि कसले जात्यांध मनसुबे ? खरंतर आता जात्यांद्यांचे विज्ञान युगात थडगे उभे करणे गरजेचे आहे. तरुणांनो तुम्ही शिवबांचे मावळे आणि शाहू-फुले-आंबेडकरांचे पाईक आहात हे विसरू नका. कबरीपेक्षा भविष्याच्या खबरीला अधिक महत्व द्या.