बीड, (रिपोर्टर)ः- रात्रीच्यावेळी अचानक घरात प्रवेश करत महिला, पुरुषांना मारहाण करून महिलांच्या अंगावरील दागिने आणि इतर मुद्देमाल घेऊन पळून जायचे, अशी मोडस असणार्या सात पैकी चार दरोडेखोरांना स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी बेड्या ठोकल्या. लुटलेले सोने विक्री करून आलेल्या पैशांची पार्टी करायला जात असतानाच पोलिसांनी त्यांना पाठलाग करून पकडले.
निखील बंडू काळे (वय 20), अविनाश बंडू काळे (वय 24), रजाक जनार्धन काळे (वय 55) आणि बाबासाहेब उर्फ चौर्या चंद्रभान चव्हाण (वय 30, सर्व रा. टाकळी, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) अशी पकडलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. हे सर्व दरोडेखोर रात्रीच्यावेळी शेतातील वस्तींवर घरी जातात. हातात काठ्या, तलवारींसह इतर शस्त्रे सोबत घेतात. घराबाहेर झोपलेले किंवा घरात झोपलेल्या लोकांना दरवाजा वाजवून उठवतात. काही समजण्याच्या आतच मारहाण करायला सुरुवात करतात. अवघ्या काही क्षणात घरातील मौल्यवान वस्तू आणि महिलांच्या अंगावरील दागिने घेऊन दुचाकीवरून पळ काढतात. शिरूर तालुक्यातील बारगजवाडी येथे 19 फेब्रुवारी तर 28 जानेवारी रोजी गेवराई तालुक्यातील बंगाली पिंपळा येथे दरोडे पडले होते. पोलिसांनी शोध लावत सात पैकी चार दरोडेखोरांना बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून दुचाकीसह मोबाइल जप्त केले आहेत. सोनेही जप्त केले जाणार आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक नवनीत काँवत, अपर अधीक्षक सचिन पांडकर, पोलिस निरीक्षक उस्मान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विजयसिंह झोनवाल, उपनिरीक्षक सिद्धेश्वर मुरकुटे, श्रीराम खटावकर, सुशांत सुतळे, तुळशीराम जगताप, हवालदार मनोज वाघ, कैलास ठोंबरे, अशोक दुबाले, सोमनाथ गायकवाड, राहुल शिंदे, दीपक खांडेकर, बाळू सानप, विकास वाघमारे, विकी सुरवसे, आलीम शेख, सुनील राठोड, सिद्धेश्वर मांजरे आदींनी केली.