दिड महिन्यापुर्वीपासून मुलगी बेपत्ता, मुलीच्या शोधासाठी विधवा आईचा आक्रोश
अंबाजोगाई, (रिपोर्टर)ः- दिड महिन्यापुर्वी इयत्ता 11 वीचा पेपर देण्यासाठी महाविद्यालयात गेलेली विद्यार्थींनी घरी आलीच नसल्याचे पाहून तिच्या कुटूंबियांनी शोधाशोध घेतला असता सदरील मुलीस फुस लावून पळवून नेल्याचे उघडकीस आल्यानंतर या प्रकरणी युसूफवडगाव पोलिसात तक्रार दिली. मात्र पोलिसांनी आजपावेत संबंधित विद्यार्थीनीस शोधून काढले नाही. अथवा आरोपींना जेरबंद केले नाही. म्हणून संतापलेल्या मुलीच्या आईने आज दुपारी 1.30 च्या सुमारास युसूफवडगाव पोलीस ठाण्यातच अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी उपस्थित पोलिसांनी मोठ्या शर्थीने तिच्या हातातला पेट्रोलचा कॅन आणि काडीपेटी हस्तगत केल्याने मोठा अनर्थ टळला मात्र या घटनेने पोलिसांचा नाचक्कीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे.

बीड जिल्ह्यात गुन्हेगारी घटनांना अंजाम देणारे गुंड प्रवृत्तीचे लोक आक्रमकपणे घटना घडवून आणतात, त्याचे व्हिडिओ काढतात हे गेल्या चार महिन्याच्या कालखंडात सातत्याने दिसून आले आहे. पोलीस यंत्रणा वेळीच गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांच्या मुसक्या बांधत नसल्याने अशा घटना पुन्हा पुन्हा घडून येतात. अंबाजोगाई तालुक्यात राहणारी एक अल्पवयीन मुलगी केज तालुक्यातील आपेगाव या ठिकाणी शिकायला होती. गेल्या दिड महिन्यापुर्वी ती परिक्षेला जाते म्हणुन महाविद्यालयात गेली ती परत आलीच नाही. तिला अज्ञाताने पळवून नेले. तशा आशयाची तक्रार तिच्या आईने दिड महिन्यापुर्वी युसूफवडगाव पोलिसात केली. मात्र युसूफवडगाव पोलिसांनी आज पावेत मुलीचा शोध लावला नाही. सदरील महिला ही विधवा असून ती आपल्या मुलीच्या शोधासाठी रोज पोलीस ठाण्यात येते. मात्र पोलीस उडवाउडवीचे उत्तर देतात. गेल्या दोनदिवसापुर्वीच माझ्या मुलीला शोधा नसता मी पोलिस ठाण्यात आत्मदहन करील असा इशारा सदरील महिलेने दिला होता. मात्र तरीही पोलिसांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले. आज दुपारी सदरील महिला ही पोलीस ठाण्यात आली. अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न तिने केला. मात्र वेळीच उपस्थित पोलिसांनी तिला रोखल्याने पुढील अनर्थ टळला. सदरची घटनाही युसूफवडगाव पोलीस ठाण्यात आज दुपारी घडली.