बीड, (रिपोर्टर) ः 3 वर्षापुर्वी बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात भीषण दुष्काळी परिस्थिती होती. या दुष्काळामध्ये पाण्यासाठी ग्रामीण भागात हापसे खोदण्यात आले होते. काही हापशांना पाणी लागण्यात आले तर काही कोरडे गेले. ज्या हापस्यांना पाणी आहे. अशावर हातपंप बसवण्यात आले होते. मात्र, कालांतराने अनेक हापसे नादुरूस्त झाले. हे नादुरूस्त हापसे दुरूस्त करण्याकडे जिल्हा परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. हे हापसे दुरूस्त केले तर गावकर्यांना सहज पाणी उपलब्ध होऊ शकते. केवळ दुरूस्तीअभावी हापसे बंद पडलेले आहेत.
मराठवाडा हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. या भागामध्ये मार्चनंतर पाणी टंचाईच्या झळा सहन कराव्या लागतात. ग्रामीण भागात पाण्याची वाईट अवस्था असते. पाणीपुरवठ्याच्या कितीही योजना राबवल्या तरी त्या तितक्या सार्थकी लागत नाही. काही ठिकाणी शोभेसाठी फक्त पाण्याच्या टाक्या बांधून ठेवण्यात आल्यात. त्यात थेंबभरही पाणी पडले नाही. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी अनेक गावामध्ये आणि शहरात बोर खोदून त्यावर हातपंप बसवण्यात आले होते. हातपंप बसवण्यात आल्यानंतर त्याच्या दुरूस्तीकडे जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत लक्ष देत नाही. एकदा हापसा खराब झाला की तो अडगळीत पडतो. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहे. अनेक वस्त्या आणि गावात पाणी टंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जे नादुरूस्त हापसे आहेत ते जर दुरूस्त केले तर नक्कीच नागरिकांना पाणी उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यात शेकडो हापसे असे आहे जे बंद पडलेले आहे. हापसा दुरूस्तीसाठी ग्रामपंचायत कुठलीही हालचाल करत नाही त्यामुळे पाणी असूनही हापसे वापरात येत नाही. हापसा दुरूस्तीसाठी जि.प. कार्यालयाकडे स्पेशल ऑफीस आहे. या ऑफिसचे नेमके काम आहे तरी काय? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.