बीड -ऑनलाईन रिपोर्टर
महाराष्ट्रातील सामाजिक आणि राजकीय वातावरण ज्या घटनेमुळे ढवळून निघालं ते सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण आता निर्णायक टप्प्यावर पोहोचले आहे. कारण या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक असलेल्या सुदर्शन घुले याच्यासह जयराम चाटे आणि महेश केदार या तिघांनी पोलिसांकडे हत्येची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे. खंडणी आणि खुनाच्या घटनेतील महत्त्वाचे तपशील समोर आल्यानंतर या तीनही आरोपींनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिल्याचे समजते.
“पवनचक्की कंपनीकडे खंडणी मागण्यात संतोष देशमुख हे मुख्य अडथळा होते. तसंच प्रतिक घुलेच्या वाढदिवशीच त्यांनी आणि मस्साजोग गावातील ग्रामस्थांनी पवनचक्की कंपनीच्या बाहेर आम्हाला मारहाण केली. तसंच त्याचे व्हिडिओ व्हायरल केल्याने आम्ही हे पाऊल उचललं,” अशी कबुली सुदर्शन घुले याने दिल्याची माहिती आहे. तसंच देशमुख यांच्या हत्येआधी हॉटेल तिरंगा इथं विष्णू चाटेसोबत बैठक घेतल्याचंही घुलेने कबुल केलं आहे.