चोरट्यांनी शेतकर्याच पूर्ण घर झाडून पुसून नेले
टाकरवण रिपोर्टर (रिपोर्टर) :- गेवराई तालुक्यातील सुर्डी बुद्रुक (टाकरवण सुर्डी) येथे शुक्रवारी भरदिवसा दुपारी एक ते दिड वाजण्याच्या सुमारास रंजित तुकाराम सोळंके यांच्या राहत्या घरी चोरट्यांनी डल्ला मारला असून घरी कोणी नसताना घरातील रोख रक्कम चार लाख रूपये व सहा तोळे सोन्याचे दागिने असा एकूण जवळपास नऊ लाख रूपयांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे.
हि घटना सोळंके कुटुंबाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती तलवाडा पोलिसांना कळविली. पोलिसांनी घटनास्थळी जावून पाहणी करून पंचनामा केला आहे. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. या घटनेची माहिती घेण्यासाठी तलवाडा पोलिसांशी संपर्क केला असता अजून गुन्हा दाखल झाला नाही असे पोलिसांकडून सांगण्यात आले. भरदिवसा झालेली हि चोरी एकप्रकारे दरोडाच आहे अशी चर्चा या परिसरात ऐकण्यास मिळत आहे. काही दिवसापूर्वी तलवाडा – माजलगाव रोडवर कदम यांच्या घरी भरदिवसा सकाळी दहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास चोरी झाली होती. भरदिवसा अशाप्रकारे तलवाडा पोलीस ठाण्याचे हद्दीत धाडसी चोरीच्या घटना घडू लागल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.