परळी वैद्यनाथ (प्रतिनिधी) – गुढीपाडवा, रमजान ईद आदी सणासुदीच्या दिवसांत परळी शहर व ग्रामीण भागातून विजेचा सातत्याने लपंडाव सुरू असल्याच्या तसेच काही भागात थकीत वीज बिलांसाठी कनेक्शन बंद केल्याच्या तक्रारी काही नागरिकांनी केल्या असून, ऐन सणासुदीच्या काळात विजेचा लपंडाव तातडीने थांबवून पूर्णवेळ वीज उपलब्ध करून द्यावी, अशा सक्तीच्या सूचना आज माजी मंत्री तथा परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत त्यांच्या परळी येथील संपर्क कार्यालयात महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री. राजपूत यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. थकीत वीज बीलांचे कनेक्शन ऐन सणासुदीत कापू नयेत, त्याचबरोबर सणाच्या काळात सक्त वसुली बाबत गरजूंना थोडा अवधी वाढवून द्यावा, याबाबतही मुंडेंनी या बैठकीत सूचना केल्या. परळी मतदारसंघातील विविध प्रस्तावित व काम सुरू असलेल्या वीज उपकेंद्राच्या कामासह ट्रान्सफॉर्मर ची मागणी, पुरवठा यांसह परळी मतदारसंघातील महावितरणच्या विविध कामांचा आढावा यावेळी धनंजय मुंडे यांनी घेत अधिकाऱ्यांना योग्य सूचना केल्या. यावेळी युवक नेते अजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वैजनाथराव सोळंके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सूर्यभान नाना मुंडे, संचालक माणिकभाऊ फड, अंबाजोगाई तालुकाध्यक्ष राजाभाऊ औताडे, शिवसेना तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे, डॉ. संतोष मुंडे, कार्यकारी अभियंता श्री. चाटे, उपअभियंता श्री. राठोड यांसह पदाधिकारी आदी उपस्थित होते.