बीड पुन्हा हादरले; अर्धमसल्यात माथेफिरूने घडवून आणला जिलेटीन स्फोट
मस्जिदच्या दारं-खिडक्यांचा खिळखिळा
घटनास्थळी पोलीस महासंचालक, पोलीस अधिक्षक डेरेदाखल
बॉम्बशोध पथक, एटीएस, श्वानपथक, फिंगर प्रिंटस् पथकाने केली पाहणी
गेवराईत संतप्त मुस्लिम बांधवांची निषेध रॅली, मुफ्ती साहब यांच्या आवाहनानंतर बंद मागे
दोन माथेफिरूंच्या पोलिसांनी दोन तासात मुसक्या आवळल्या
गेवराई (भागवत जाधव): पवित्र रमजान महिन्यात ईदच्या आदल्या दिवशी गेवराई तालुक्यातल्या अर्धमसल्यात मस्जिदमध्ये जिलेटीनचा स्फोट घडवून आणल्याची संतापजनक आणि खळबळजनक घटना मध्यरात्री घडली. स्फोट घडवणार्या दोघा जणांना पोलिसांनी पहाटेच्या दरम्यानच जेरबंद केले. या घटनेने जिल्हाभरात संतापाची लाट उसळली असून अर्धमसल्यात पोलीस महासंचालकांसह जिल्हा पोलीस अधिक्षक, बॉम्बशोध पथक, श्वानपथक, एटीएस यासह अन्य पथके डेरेदाखल आहेत. व्हिडिओ रेकॉर्डींगद्वारे घटनास्थळ पंचनामा करून पोलिसांनी दोघांविरोधात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल केले आहेत. या घटनेनंतर अर्धमसला येथील मुस्लिम बांधवांनी दोषींवर कठोर कारवाई बरोबर या स्फोट घडवण्यामागे अन्य कोणाचा हात आहे का? हे शोधण्याची मागणी केली. त्याचबरोबर अफवांवर विश्वास न ठेवता शांततेचे आवाहन केले तर दुसरीकडे गेवराई शहरात मुस्लिम बांधवांनी निषेध रॅली काढून बंद पुकारण्याबाबत आवाहन केले. मात्र छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुस्लिम आणि हिंदू समाजातील प्रतिष्ठीतांसह चळवळीतील नागरिकांनी एकत्रित येत मुस्लिम धर्म गुरू मुफ्ती साहब यांनी उपस्थितांना आवाहन करत आज पाडवा उद्या ईदचा सण आहे, अशा सणासुदीच्या दिवसात अशांतता पसरेल, असे कोणीही काम करू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये, आरोपींना अटक करण्यात आली आहे, त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई पोलीस करेल, असे उपस्थित मुस्लिम बांधवांना बंद मागे घेण्याबाबत विनंती केली. सध्या गेवराई तालुक्यात तणावपुर्ण शांतता असून गेवराई शहरासह अर्धमसल्यात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

बीड जिल्ह्याचे सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचा प्रयत्न आज गेवराई तालुक्यातील अर्धमसला या गावात घडला. या गावातील माथेफिरू विजय राम गव्हाणे (वय 21 वर्षे) याने आपला साथीदार श्रीराम सागडे (वय 21 वर्षे) याला सोबत घेऊन आठ ते दहा जिलेटीन कांड्या एकत्रित करून त्या खिडकीद्वारे मस्जिदमध्ये सोडल्या आणि रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास स्फोट घडवून आणला. या मध्यरात्री घडलेल्या स्फोटाने अवघे गाव जागे झाले. मस्जिदच्या दिशेने धावले तेव्हा मस्जिदमध्ये स्फोट झाल्याचे प्रथमदर्शी लक्षात आले. घटनेची माहिती तात्काळ तलवाडा पोलिसांना देण्यात आली. पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ नरके हे अवघ्या वेळात घटनास्थळी पोहचले. पाठोपाठ गेवराई पोलीसही घटनास्थळी धावली. पहाटेच्या दरम्यान जिल्हा पोलीस अधिक्षक नवनीत काँवत हे बॉम्बशोध पथक, श्वानपथक, फिंगर प्रिंटस् एक्सपर्ट यांच्यासह घटनास्थळावर आले. घटनेचे गांभीर्य पाहून औरंगाबाद परिक्षेत्राचे पोलीस महासंचालक विरेंद्र मिश्र यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा कागदावर तर केला त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही करून ठेवले. घटना अत्यंत गंभीर असल्याने यातील आरोपींना शोधण्यासाठी पहाटेच वेगवेगळ्या टीम काम करत होत्या. सरशेवटी पोलीस निरीक्षक संतोष जवंजाळ यांच्या पथकाने यातील मुख्य आरोपी विजय राम गव्हाणे याच्या ईटकूर परिसरामध्ये मुसक्या आवळल्याचे सांगण्यात येते. त्याच्या बरोबर श्रीराम सागडे याच्याही मुसक्या बांधण्यात आल्या. पोलीस प्रशासनाच्या वतीने आणि गावकर्यांच्या वतीने आज सकाळी शांतता बैठक घेण्यात आली. या दोन्ही आरोपींविरोधात भारतीय न्यायसंहीता बी.एन.एस 2023 कलम 298, 299, 196, 326 (जी) 351 (2), 351 (3), 352, 61 (2), 3 (5) भारी पदार्थ 1908 कलम 3, कलम 4, कलम 5 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माथेफिरूचा रात्री झाला होता वाद
अर्धमसला या ठिकाणी रात्री उरुसच्या संदलचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला. या संदलच्या कार्यक्रमात हिंदू-मुस्लिम एकत्रित येत उत्सव साजरा करत होते. त्या दरम्यान माथेफिरू विजय गव्हाणे याचा कोणासोबत तरी वाद झाला होता. रात्री संदलचा कार्यक्रम 12 ते साडेबाराच्या सुमारास संपला. लोक घरी गेले. मध्यरात्रीच्या दरम्यान माथेफिरू विजय गव्हाणे याने सोशल मिडियावर एक व्हिडिओचा स्टेटस ठेवला. त्यात स्पष्टपणे जिलेटीनचा गठ्ठा त्याच्या हातात दिसून येत होता.
स्फोट घडल्यानंतर संताप
ईदच्या आदल्या दिवशी पवित्र रमजान महिन्यात मस्जिदमध्ये जिलेटीनचा स्फोट घडवून आणल्याची वार्ता जिल्हाभरात पसरली. या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. घटनेचा सर्वस्तरातून निषेध केला जात आहे. या घटनेला अंजाम देणारे दोन आरोपी पकडले आहेत, मात्र त्यांच्या पाठिमागे अन्य कोणी आहे का? स्फोट घडवून आणण्यामागचा उद्देश काय होता? यासह अन्य बाबींचा शोध पोलीसांनी घ्यावा, अशी मागणी होत आहे.
स्फोटानंतर गेवराई मुस्लिम बांधव रस्त्यावर
अर्धमसला येथील या घटनेनंतर गेवराई शहरात सकाळपासून मुस्लिम समाज बांधवांनी एकत्र येऊन निषेध रॅली काढत शहरातील सर्व मार्केट बंद केले होते. दरम्यान मुस्लिम समाजातील काही सामाजिक चळवळीतील नेत्यांनी व दारुलूमचे मौलाना मुक्ती मोहिनोद्दिन साहाब यांच्या मध्यस्थीने सर्व मुस्लिम बांधवांना छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे एकत्र करून शांततेचा आवाहन करत आज गुढीपाडवा उद्या ईद च्या पार्श्वभूमीवर हे मार्केट बंद करणे योग्य नसून सदरील घटना ही निषेधार्य असून याच घटनेतील दोन्ही आरोपींना पोलीस प्रशासनाने तात्काळ अटक केल्यामुळे आज पाडव्याच्या व उद्या असणार्या ईद च्या पार्श्वभूमीवर शहरातील अचानक केलेला बंद मागे घेऊन सर्व समाज बांधवांना शांततेचे आवाहन करत वातावरण शांत केले. यावेळी दारूलउलूम येथील मुस्लिम धर्म गुरू मौलाना मुक्ती मोहिनोद्दीन साहाब, आमदार विजयसिंह पंडित, माजी मंत्री बदामराव पंडित, ऍड. शेख शफीक, सभापती मुजीब पठाण, जेडी शहा यांच्यासह सर्व समाजाचे सामाजिक कार्यकर्ते यांनी पुढाकार घेऊन वातावरण शांत करून गेवराई शहरातील मार्केट सुरळीत केले.
पोलीस प्रशासनाकडून शांततेचे आवाहन
स्फोट घडवणार्या दोघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत, त्यांच्यावर कठोर स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी पोलीस आणखी तपास करत आहे. त्यामुळे कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे म्हणत जिल्हा पोलीस अधिक्षक नवनीत काँवत यांनी शांततेचे आवाहन केले.
अर्धमसल्याचे सरपंच मुस्लिम
अर्धमसल्यात घटना घडल्यानंतर उपस्थित मुस्लिम बांधवांनी संताप तर व्यक्त केलाच परंतु अर्धमसला या गावात हिंदू मुस्लिम गुण्यागोविंदाने राहतात. इथे दीड-दोनशेच मुस्लिम समाज आहे मात्र मागच्या टर्मला गावचा सरपंच हा मुस्लिम समाजाचा होता. यावरून इथे हिंदू-मुस्लिम गुण्यागोविंदाने राहतात असं म्हणत एका मुस्लिम बांधवाने अटक केलेल्या आरोपींच्या मागे कोण आहे? हे शोधा अशी मागणी करत कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन केले. मस्जिदीमध्ये साफसफाई करण्यात आली असून दुपारची नमाज इथेच होणार आहे त्याचबरोबर उद्या ईदची नमाजही याच ठिकाणी होणार आहे.
माथेफिरूच्या मागे कोण? शोध घ्या, जनता संयमी मात्र संतापही तेवढाच अफवांवर विश्वास ठेवू नका, शांतता राखा -शेख तय्यब
अर्धमसला या ठिकाणी एका मस्जिदमध्ये विजय गव्हाणे व त्याचा साथीदार श्रीराम सगडे यांनी जिलेटीनच्या सहाय्याने स्फोट घडवून आणला हे अत्यंत संतापजनक आहे. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. परंतु या माथेफिरूंच्या मागे कोण? याचा शोधही व्हायला हवा. बीड जिल्ह्यात अशांतता निर्माण व्हावी यासाठी सातत्याने प्रयत्न होतात. अशा असामाजिक तत्वाच्या लोकांचे मनसुबे जिल्ह्यातील जनता पुर्ण होऊ देणार नाही, लोक संयमी आहेत. अशा घटनांमुळे संतापही तेवढाच निर्माण होतो. घडलेली घटना अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह असल्याचे सांगून बीड जिल्ह्यातील जनतेने कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी, असे आवाहन मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे संचालक शेख तय्यब यांनी केले आहे.
माथेफिरू नव्हे एकप्रकारचा दहशतवादीच
मस्जिदमध्ये स्फोट घडवणारा विजय गव्हाणे आणि त्याचा साथीदार नुसता माथेफिरू नव्हे तर एकप्रकारचा दहशतवादीच म्हणावा लागेल. काल रात्री सय्यद बादशाह यांचा संदल कार्यक्रम सुरु असताना विजय गव्हाणे हा तिथे आला, मुस्लिम समाजाला उद्देशून जातीवाचक शिवीगाळ केली, इथे मस्जिद कशाला बांधली? ती पाडून टाका, नाहीतर आम्ही पाडू असं म्हणत गोंधळ घातला. या वेळी गावातल्या लोकांनी त्याला समज दिली. मात्र विजय गव्हाणेने रात्रीच जिलेटीनचा गठ्ठा जमा केला, त्याचा व्हिडिओ काढला, तो इन्स्टाग्रामवर टाकला आणि रात्री अडीच वाजता मस्जिदमध्ये स्फोट घडवून आणला. या घटनाक्रमावरून आणि त्याच्या वर्तनावरून तो दहशतवादीच म्हणावा लागेल.
पोलीस प्रशासनाने हलगर्जीपणा केला तर तुमच्या आधी मी रस्त्यावर उतरेल -विजयसिंह पंडित
घडलेली घटना अत्यंत गंभीर आणि चुकीची आहे. यात कारवाई झाली आहे, आरोपींना अटक करण्यात आली आहे. परंतु पोलीस प्रशासनाकडून त्या तपासात अथवा त्या कारवाईत काही हलगर्जीपणा झाला तर तुमच्या पुढे रस्त्यावर उतरायला मी आहे. आता खरंतर शांत रहा, आज पाढव्याचा दिवस आहे, उद्या ईद आहे. गेवराई तालुका हा सातत्याने सर्व धर्म समुदायाला एकत्र घेऊन एकोप्याने राहत आला आहे, माझं एवढच सांगणं आहे, सणासुदीच्या या काळात आपण शांत रहावं, पुढे तपासकामात अथवा या प्रकणणात तुम्हाला काही वाटलं तर तुमच्या आधी मी रस्त्यावर उतरेल, असे म्हणत आ. विजयसिंह पंडित यांनी मुस्लिम बांधवांसमोर शांततेचे आवाहन केले.