बीड -ऑनलाईन रिपोर्टर
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार हे आज जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी राष्ट्रवादीच्या युवा पदाधिकाऱ्यांकडून आयोजित कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या. माझा सत्कार करू नका, शाल-श्रीफळ देऊ नका, कारण आई-वडील आणि चुलत्याच्या कृपने आमचं बरं चाललंय, असं अजित पवार यावेळी म्हणाले. राष्ट्रवादीतील फुटीनंतर दोन्ही गटांत निर्माण झालेल्या राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी जाहीर भाषणात आपल्या काकांची आठवण काढल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्याचे पाहायला मिळाले.
युवा संवाद मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना अजित पवार म्हणाले की, “विकासकामांना निधी देण्याचं काम मी करेन. पण काम झाल्यानंतर ती गोष्ट सांभाळण्याची जबाबदारी तुमची आहे. नाहीतर एखाद्या ठिकाणी थुंकणे, कचरा करणे असे प्रकार होता. आमच्यासारख्या नेतेमंडळींचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार केला जातो. त्यावर कागद तसाच असतो. काहीजण मोठा हार आणतात आणि त्याची पिशवी तशीच खाली ठेवतात. अशा खाली ठेवल्या जाणाऱ्या पिशव्या मी उचलायला सुरुवात केल्यानंतर काहीजण आता लाजंकाजं ते उचलायला लागले आहेत. पण असा सत्कार करण्याची काहीही गरज नाही. कर्मधर्म संयोगाने आणि आई-वडील, चुलत्याच्या कृपेनं आमचं बरं चाललंय,” असं अजित पवारांनी कार्यकर्त्यांना उद्देशून म्हटलं आहे.