बीड (प्रतिनिधी) – एका प्रसिद्ध वृत्त वाहिनीचे प्रख्यात पत्रकार विलास बडे यांच्यावर आपल्या हत्येचा कट रचल्याचा आरोप करणारे सुरेश धस यांनी आपल्या आरोपावरून घुमजाव करत आपण विलास बडे यांचे अनवधानाने नाव घेतले असून त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत असल्याचे एक व्हिडिओ प्रसारित करून स्पष्ट केले आहे. सुरेश धस हे विलास बडे यांचे नाव अनवधानाने घेतल्याचे म्हणत आले तरी त्यांनी जवळपास तीन वेगवेगळ्या मुलाखतीत हे नाव घेतले होते, त्यामुळे त्यांनी ते वक्तव्य जाणीवपूर्वकच केले होते, हे स्पष्ट आहे. तेवढच नाही तर अंगलट आल्याचे समजताच नेहमीप्रमाणे त्यांनी माफी मागितली आहे!
सतीश भोसले उर्फ खोक्या या अट्टल गुन्हेगाराचे कारनामे समोर आल्याने अडचणीत आलेले सुरेश धस यांनी या प्रकरणाच्या आडून दोन पत्रकार मिळून आपल्या हत्येचा कट रचत असल्याचा गंभीर आणि तितकाच हास्यास्पद आरोप केला होता. मात्र त्यांनी बडे यांच्या बाबत केलेल्या वक्तव्यावरून माघार घेत माफी मागितल्याने ते पुन्हा एकदा बॅकफुटवर गेले आहेत. विशेष म्हणजे सुरेश धस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात जसजसे प्रकरण लावून धरले तसतसे त्यांनी एका विशिष्ट समाजाला याआडून टार्गेट केले आहे. समाजातील अधिकारी – कर्मचाऱ्यांना टार्गेट करताना त्यांनी बिंदू नामावली बाबत आक्षेप घेतला. त्यानंतर त्यांनी आता त्याच समाजातील पत्रकारांना टार्गेट केले असल्याचे बोलले जात असून सुरेश धस यांच्या वागण्यातील हा द्वेष त्यांचे राजकीय अधःपतन करण्यास कारणीभूत ठरणार असल्याचे बोलले जात आहे.
धसांची तोंडघशी अन् माफीनामे
परळीच्या व्यापारी अमोल डुबे अपहरण प्रकरणात धसांनी केलेले आरोप दुसऱ्याच दिवशी खोटे ठरले, त्यानंतर त्यांनी त्या विषयावर बोलणे टाळले. डॉ. लोढा यांच्या चारिटी दवाखान्याची जागा उपलब्ध करून देण्याबाबत त्यांनी धनंजय मुंडे यांच्या वर गंभीर आरोप केले परंतु डॉ. लोढा यांनी उलट धनंजय मुंडे यांनीच मदत केल्याचे सांगत धसंना तोंडावर पाडले. भास्कर केंद्रे नामक पोलीस कर्मचारी १०० टिपर व १५ जेसीबी चा मालक असल्याचा दावा करणाऱ्या धस यांना संबंधित पोलिसाने माझ्या किंवा कुटुंबाच्या मालकीचे एक टिपर तर सोडा एक टायर तरी आहे का शोधून दाखवा, असे खुले आव्हानच केले, त्यानंतर धस यांनी या विषयावर चकार शब्द काढला नाही. जेलमधील मारामारी प्रकरणावर सुरेश धस यांनी प्रतिक्रिया देण्याची गडबड करत राजकीय आरोप केले मात्र पुढील एक तासातच ते आरोप पूर्णपणे खोटे ठरले. राखेचे ४०० टिपर शोधायला जाण्याचे देखील सुरेश धस यांनी पुन्हा अवाक्षर काढले नाही. परळी अंबाजोगाई मध्ये जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ७४ कोटी रुपयांची बोगस कामे झाली असून काम न करताच बिल उचलले असल्याचे गंभीर आरोप करत सुरेश धस यांनी काही कागद पुढे केले, मात्र सचिव व स्वतः नियोजन मंत्र्यांनी सदर आरोपांच्या चौकशी अंती संबंधित आरोप पूर्णतः चुकीचे असल्याचे स्पष्ट केल्याने याही बाबतीत सुरेश धस तोंडावर पडले आहेत. धनंजय मुंडे यांच्या बाबत सातत्याने आरोप करून कागद समोर मांडणारे सुरेश धस एक दोन नव्हे तर तब्बल तीन वेळा मुंडेना अंधारात भेटले. चार चार तासांच्या बैठका घेतल्या. अर्थात बैठकीत काय चर्चा झाली असेल व त्याचे फलित काय निघाले असेल ते धसांच्या वक्तव्यावरून दिसून येत आहे. दरम्यान केवळ एका जातीचे म्हणून दोन ठराविक पत्रकारांना बदनाम करून त्यांच्याविरुद्ध गंभीर आरोप करणारे सुरेश धस पुन्हा एकदा सेल्फ गोल झाल्याने त्यांच्या विश्वासार्हतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.