बीडच्या उद्योगांना चालना देण्यासाठी बीडमध्ये कौशल्य विकास केंद्राची स्थापना
बीडच्या उद्योग परिषदेमध्ये ना.उदय सामंतांची घोषणा.

बीड, (रिपोर्टर)ः- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती आणि पंतप्रधान रोजगार निर्मिती या कार्यक्रमा अंतर्गत राज्यभरात प्रत्येक जिल्ह्याला जे टार्गेट दिलेले आहे ते अन्य जिल्ह्यांनी पूर्ण केले. मात्र बीड जिल्हा हे टार्गेट पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याचे सांगत केवळ 35 टक्के एवढेच उद्दीष्ट उद्योग विभागाने साध्य केल्याची धक्कादायक माहिती दस्तुरखूद उद्योगमंत्र्यांनी आज बीडच्या उद्योग परिषदेमध्ये दिली. या परिषदेमध्ये उद्योग मंत्र्यांनी बेरोजगारांसह उद्योजक आणि नव उद्योजकांना अडी अडचणी विचारल्या त्यावेळी बँक कर्ज प्रकरणात अडचणी आणतात, उद्योग विभाग म्हणावे तसे साथ देत नाही हे कानावर पडल्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना सूचना देत काम व्यवस्थीत करा, जे काम करणार नाही त्याच्या मी बदल्या करीन, तुम्ही स्वतःहून या प्रकरणात लक्ष द्या असे म्हंटले. सामंतांच्या या उद्योग परिषदेने रिकामे उद्योग आता बीडमध्ये बंद होतील अशी आशा बाळगायला हरकत नाही.
बीडमध्ये आज हॉटेल यशोदा या ठिकाणी उद्योग परिषदेचे उद्घाटन केल्यानंतर सामंत बोलत होते.सामंत पुढे बोलतांना म्हणाले की, बीडच्या उद्योग विश्वासतही उत्साह नाही आणि माझ्या विभागाच्या अधिकार्यामध्येही उत्साह नाही. राज्यात इतर ठिकाणी हे उद्दीष्ट 120 टक्कयांच्या पुढे आहे. उद्योग विभागाने साध्य केलेले आहे. बीड वगळता इतर ठिकाणी माझे सर्वच अधिकारी चांगलंच काम करतात. या उद्योग परिषदेला मी किमान 100 उद्योजकांना बोलवा असे सांगितले हेाते. मात्र इथं मोजून मला केवळ 25 उद्योजक दिसताहेत. एकास 5 असे उद्योजकांची संख्या आणली आहे का असे बोलून 35 टक्के जे उद्दीष्ट साध्य केले आहे ते महिनाभरामध्ये या अधिकार्यांनी 100 टक्के साध्य करावं. 500 मुख्यमंत्री रोजगार निर्मितीचा प्रस्ताव आणि 500 पंतप्रधान रोजगार निर्मितीचे कार्यक्रम यांना मंजूरी मिळवून घ्यावी. राज्यातल्या मागास असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात सुध्दा उद्योग मंजूरीच्या प्रस्तावाची संख्या बीडपेक्षा जास्त आहे. त्यामुळे बीडच्या अधिकार्यांने याबाबी गांभीर्याने घ्याव्यात.
बीड जिल्ह्यात 900 कोटींची गुंतवणूक
बीड जिल्ह्यात स्थानिक पातळीवर बेकरी उद्योगापासून ते बचतगटाच्या उद्योगापर्यंत विविध व्यवसायात जवळपास 900 कोटींची गुंतवणूक छोटे छोटे व्यवसायीक करणार आहेत. त्यातून 2 हजारांच्या जवळपास रोजगार निर्मिती होणार आहे. हे जे 900 कोटींची गुंतवणूक ही छोट छोट्या व्यवसायीकांची असून त्यात एक एक व्यवसाय 1 कोटी ते 5 कोटीच्या दरम्यान गुंतवणूक करणार आहे. मात्र भरीव अशी गुंतवणूक व्हावी असेही उद्योगमंत्री सामंत यांनी सांगितले.
गडचिरोली, रत्नागिरी, कल्याण-डोंबवली, पुण्या पाठोपाठ बीडमध्ये
कौशल्य विकास केंद्र.
गेल्या वर्षेभरापुर्वी उद्योगपती स्व.रतन टाटा यांना राज्यसरकारने उद्योग रत्न पुरस्काराने सन्मानित केले होते. त्यावेळी रतन टाटा यांनी राज्यातील युवकांच्या स्कील बाबत भाष्य केले होते. तरूणांच्या स्कील डेव्हलपमेंटसाठी प्रयत्न करण्याच्याही सूचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने राज्यामधील गडचिरोली, रत्नागिरी, डोंबिवली-कल्याण, पुणे या ठिकाणी राज्य सरकारने कौशल्य विकास केंद्राची स्थापना केली. पाठोपाठ आता बीडमध्ये ही कौशल्य विकास केंद्राची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली. या केंद्रात अनेक उद्योजकांना प्रशिक्षण देण्यात येणार असून टाटा कन्स्लटींगच्या माध्यमातून या केंद्रासाठी 120 कोटी रूपये तर जिल्हा नियोजन मंडळातून 30 कोटी रूपयांची तरतुद या विकास केंद्रासाठी करण्यात येणार.