मुंबई, (रिपोर्टर)ः- संयुक्त पूर्व परीक्षेच्या पार्श्वभूमीवर जागा वाढवण्याची मागणी करत एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी काल मुंबईत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर मी याबाबत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिणार असून फोनद्वारेही त्यांच्याशी बोलणार असल्याची माहिती शरद पवार यांच्याकडून देण्यात आली आहे.

शरद पवार यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे की, मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटर येथे संयुक्त पूर्व परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या परीक्षेच्या जागावाढ संदर्भात काल भेट घेतली. ही परीक्षा दोन वर्षांनंतर होतेय. त्यामुळे आयोगाने घेतलेल्या वयवाढीच्या निर्णयाचा फायदा सदर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचा असेल तर, 480 जागांची म्हणजेच ही जाहिरात तुटपुंजी आहे. अशा परिस्थितीत जागावाढ करण्याची विद्यार्थ्यांची मागणी रास्त आहे. या सर्व जागा मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने शासनाला आणि आयोगाला देखील जागावाढ करण्यास कुठलीही अडचण असण्याचं कारण नाही. या संदर्भात मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांना पत्र पाठवणार असून आज दूरध्वनीवर देखील संपर्क साधणार आहे, अशी माहिती पवार यांनी दिली.