केज शहरातील घटना, आरोपी अल्पवयीन
केज, (रिपोर्टर)ः- बीड जिल्ह्यामध्ये गेल्या काही महिन्यापासून गंभीर स्वरूपाच्या घटना घडत आहेत. 14 एप्रिल रोजी केज शहरातील दोन अल्पवयीन मुलामध्ये चिकनच्या विक्रीवरून वाद निर्माण झाला. या वादातून एका मुलास सिमेंटच्या नाल्यावर आपटण्यात आले. यात तो गंभीररित्या जखमी होवून मरण पावला. रात्री या प्रकरणी केज पोलिस ठाण्यात अल्पवयीन आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या काही महिन्यापासून जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना घडत आहेत. कोणत्या ना कोणत्या कारणावरून बीड चर्चेत आहे. दोन दिवसापुर्वी माजलगाव येथे खूनाची गंभीर घटना घडली. या घटनेने जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात खळबळ उडाली होती. 14 एप्रिल रोजी केज शहरातील बसस्थानक परिसरात दोन मुलांमध्ये चिकन विक्रीच्या कारणामुळे वाद निर्माण झाला. या वादातून एका चौदा वर्षीय रेहान कुरेशी या मुलास सिमेंटच्या नाल्यावर जोरात आदळण्यात आले. यामध्ये तो जागीच मरण पावला. चौदावर्षीय मुलाचा खुन करणारा आरोपी देखिल अल्पवयीन आहे. घटना घडल्यानंतर रात्री उशीरा या प्रकरणामध्ये केज पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने पुन्हा एकदा बीड जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे. किरकोळ कारणावरून हा वाद निर्माण झाला आणि तो अत्यंत टोकाचा झाला. या प्रकरणाचा अधिक तपास केजचे पोलीस करत आहेत. घटना घडल्यानंतर अल्पवयीन आरोपी मात्र फरार झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.