गजाननची शिट्टी, कष्टकरी, शेतकरी, बेरोजगारांच्या प्रश्नांची करणार सुट्टी
अतिरिक्त उसाचा प्रश्न मिटणार, कष्टकर्यांच्या हाताला काम
बेरोजगारांना मिळणार नोकर्या, संदीप क्षीरसागरांचे काकू-नानांच्या विचारावरचे महत्वाचे पाऊल
बीड (रिपोर्टर) राजकारण, सत्ताकारण करत असताना समाजकारण कधी विसरायचं नाही. लोकांचे प्रश्न स्वत:चे प्रश्न समजून ते सोडवण्यासाठी अटकेपार प्रयत्न करायचे. लोक जिथे अडतील तिथे त्यांच्या सोबत राहून अडलेल्या-नडलेल्यांना मदत करायची. ही स्व. केशरकाकु आणि सोनाजीराव क्षीरसागर यांची शिकवण आत्मसात करून नव्हे तर त्यांनी दिलेल्या समाजकारणाच्या दिक्षेवर पुढे चालत आ. संदीप क्षीरसागर लोकहिताचे काम करत असताना आता ते शेतकर्यांपासून कष्टकरी, कामगार आणि बेरोजगारांसाठी लक्ष केंद्रित करत आहेत. गजानन कारखान्याच्या माध्यमातून बीडसह शिरूर तालुक्यातील आणि जिल्ह्यातील बहुतांशी बेरोजगारांना या कारखान्याच्या माध्यमातून नोकरी मिळणार आहे तर गंभीर बनलेल्या अतिरिक्त उसाच्या प्रश्नावर गजानन सहकारी साखर कारखाना हा जालीम उपाय ठरणार आहे. त्यामुळे या भागातील अडलेल्या शेतकर्यांना खर्या अर्थाने सुगीचे दिवस येणार आहेत.
गेल्या कित्येक वर्षांपासून बंद पडलेला गजानन सहकारी साखर कारखाना आता आ. संदीप क्षीरसागर यांच्या पुढाकारातून पुन्हा एकदा सुरू होत आहे. ही बातमी खर्या अर्थाने बीड, शिरूर तालुक्यांसह जिल्हाभरातील शेतकरी, कष्टकरी, बेरोजगारांसाठी सुगीचे दिवस आणणारी गेल्या अडीच-तीन वर्षांच्या कालखंडामध्ये आ. संदीप क्षीरसागर यांनी बीड विधानसभा मतदारसंघातील शहरी भागासह ग्रामीण भागात अनेक विकासाची कामे केली. रस्ते, नाल्या यासह मोठमोठ्या प्रश्नांना हात घालत कधी न सुटणारे तलावापासून बंधार्यापर्यंतचे प्रश्न त्यांनी सोडवले. हे करत असताना काकु-नानांच्या विचारावर चालणार्या आ. संदीप क्षीरसागरांनी बीड जिल्ह्यासह मतदारसंघातील शेतकरी, कष्टकरी आणि बेरोजगारांची निकड लक्षात घेऊन बंद पडलेला गजानन सहकारी साखर कारखाना लि. सोनाजी नगर नवगण राजुरी ता. जि. बीड हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. 28 जुलै रोजी प्रत्यक्षात हा कारखाना सुरू करण्याबाबत ज्या प्रोसेस असतात त्या कारखान्याचे चेअरमन रविंद्रदादा क्षीरसागर, डायरेक्टर सौ. नेहाताई संदीप क्षीरसागर यांच्या उपस्थितीत सुरू झाल्या. गजानन कारखाना हा अवघ्या दोन ते तीन महिन्यांमध्ये गाळपासाठी तयार होणार असून या हंगामात गाळप सुरू होणार आहे. चालूवर्षी जिल्ह्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर बनला. अनेक शेतकर्यांना उभा ऊस शेतातच ठेवावा लागला. अशा संकटाच्या वेळी संदीप क्षीरसागर यांनी गजानन कारखाना सुरू करण्याचा निर्णय घेतला तो शेतकर्यांसाठी पर्वणीचा निर्णय म्हणावा लागेल. या कारखान्यामुळे शतेकरी, कष्टकरी आणि बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार आहे. कारखान्यात छोटे-मोठे कर्मचारी दोनशेच्या आसपास लागतील. त्यापुढे जात अन्य कामांसाठी मोठ्या प्रमाणावर कामगार लागतात. त्यामुळे या भागातील बेरोजगारांचा प्रश्नही कारखान्याच्या माध्यमातून सुटणार आहे. संदीप क्षीरसागरांची दूरदृष्टी ही विकासात्मक दृष्टीकोन समोर ठेवणार आहे हे पुन्हा एकदा या निर्णयातून सिद्ध होते. काकू-नानांच्या विचारांवर चालणार्या आ. संदीप क्षीरसागरांच्या या धडाकेबाज निर्णयाचे स्वागत जनतेतून होत आहे.