बीड जि.प.च्या ग्रामीण विकास यंत्रणेचा उपक्रम

बीड, (रिपोर्टर)ः- केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध घरकुल योजने अंतर्गत 71 हजार घरकुलांना प्रशासकीय मंजूरी दिलेली आहे. काही घरकुलांना पहिला तर काही घरकुलांना दुसरा हप्तापण वितरीत करण्यात आलेला आहे. 31 मार्च 2026 पर्यंत या घरकुलाचे बांधकाम करावयाचे आहे. मात्र घरकुलाची अपुरी आर्थिक प्रशासकीय मंजूरी आणि वाळूचे वाढलेले भाव यामुळे लाभार्थ्यांकडुन वेळेत घरकुल बांधले जात नाही. ही बाब गांभीर्याने घेवून येत्या दिवाळीपर्यंत या 71 हजार घरकुलांपैकी किमान 50 हजार घरकुलांचे बांधकाम दिवाळीपर्यंत करून लाभार्थ्यांचा प्रवेश नवीन घरकुलात करण्याचा स्तुत्य उपक्रम जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने हाती घेतला आहे.
पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये मागे प्रशासकीय अधिकार्यांच्या बैठकीमध्ये बीड जिल्हा परिषद ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका श्रीमती संगीतादेवी पाटील यांनी सीईओ आदित्य जिवने यांच्या मार्गदर्शनात येत्या दिवाळीपर्यंत 50 हजार घरकुले कसे बांधून पूर्ण होतील याबाबतचा पीपीटी अहवाल पालकमंत्र्यांना सादर केला होता. त्यामध्ये गाव पातळीवर ग्रामसेवक, सरपंच आणि तलाठी यांनी या घरकुल बांधकामांना प्रोत्साहन देण्याबरोबरच जिल्हा परिषद गटस्तरावर विस्तार अधिकारी दर्जाच्या एका अधिकार्याची नियुक्ती या घरकुल बांधकामासाठी केलेली आहे. या अधिकार्याने आपले प्रशासकीय कामकाज करत या गटातील जे गावं आहेत त्या गावातील लाभार्थ्याने घरकुलाचे बांधकाम केले का नाही याची देखरेख करणार आहेत. त्याच्या अडचणी समजून घेणार आहेत अशा पध्दतीने बीड जि.प.ने राज्यात प्रथमच हा उपक्रम राबवत आहे.