जालना :रिपोर्टर
मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी कालच आपल्या पुढील आंदोलनाची दिशा जाहीर केली. आता, मिशन मुंबई म्हणत मनोज जरांगे पाटलांनी सरकारला अल्टीमेटम दिला आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने त्यांच्या मराठवाड्यात सातत्याने बैठका होत आहेत. त्याच बैठकांसाठी दौरा करत असताना मनोज जरांगे यांची तब्येत आज पुन्हा अचानक बिघडली. जालन्यातून बीड (Beed) दौऱ्यावर जात असताना भोवळ आल्याने मनोज जरांगे दौरा सोडून माघारी परतले आहेत. त्यानंतर, छ. संभाजीनगरमधील खासगी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले.
सध्या उन्हाळाचा जोर असून मराठवाड्यात तापमानाने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे, मराठवाड्यातील काही जिल्ह्यात जिल्हा शल्य चिकित्सकांनी नागरिकांना दुपारी बाहेर न पडण्याचे व काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. त्यातच, मनोज जरांगे पाटील हे आज बीड दौऱ्यावर असताना त्यांना भोवळ आली. जरांगे पाटील यांना उप्षाघात म्हणजे सनस्ट्रोक अतिसाराचा त्रास होत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. तसेच, पुढील काही दिवस विश्रांतीचा सल्ला देखील डॉ. विनोद चावरे यांनी दिला आहे.