
कोकण नं.1, लातुर पॅटर्न फेल
राज्याचा 91 टक्के निकाल, गतवर्षीपेक्षा यावर्षी निकालाची टक्केवारी घसरली
मुंबई, (रिपोटृर)ः- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेला 14 लाख 17 हजार 969 विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती. त्यापैकी 13 लाख 87 हजार 468 विद्यार्थी म्हणजेच 91.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या निकालात 1.49 टक्क्यांची घट झाल्याचे दिसून आले आहे.
बहुप्रतिक्षित बारावीचा निकाल सोमवारी 5 मे 2025 जाहीर करण्यात आला. राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधील 14 लाख 27 हजार 85 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये कोकण विभागाचा निकाल 96.74 टक्के असून तो सर्वाधिक आहे, तर लातूर विभागाचा निकाल 89.46 टक्के असून तो सर्वात कमी नोंदवला गेला आहे.
यंदाही मुलींनी निकालात बाजी मारली आहे. मुलींचा उत्तीर्ण टक्का 94.58, तर मुलांचा 89.51 टक्के आहे. त्यामुळे मुलींनी मुलांपेक्षा 5.07 टक्क्यांनी अधिक यश मिळवले आहे.बारावीच्या परीक्षेला राज्यभरातून लाखो विद्यार्थी बसले होते. गेल्या काही वर्षांप्रमाणेच यंदाही निकालात विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी केली आहे. विद्यार्थ्यांचे सरासरी यश दरवर्षी सुधारत चालल्याचे शिक्षण मंडळाच्या आकडेवारीतून स्पष्ट होते.
यंदा निकालाचा टक्का घसरला
यंदा निकालाचा टक्का घसरला असून फेब्रुवारी मार्च 2024 चा निकाल 93.37 टक्के लागला होता. तर, फेब्रुवारी मार्च 2025 चा निकाल 91.88 टक्के लागला. त्यामुळे यंदा महाराष्ट्र बोर्डाच्या बारावी परीक्षेचा निकालाचा टक्का 1.49 नं घसरला आहे.
विभागनिहाय निकाल
कोकण : 96.74 टक्के
पुणे : 91.32 टक्के
कोल्हापूर : 93.64 टक्के
अमरावती : 91.43 टक्के
छत्रपती संभाजीनगर : 92.24 टक्के
नाशिक : 91.31 टक्के
लातूर : 89.46 टक्के
नागपूर : 90.52 टक्के
मुंबई : 92.93 टक्के