
मुंबई, (रिपोर्टर)ः- राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आल्यास लाडक्या बहिणींना 1500 रुपयांत वाढ करुन 2100 रुपये देण्यात येतील, अशी घोषणा महायुतीच्या जाहीरनाम्यात करण्यात आली होती. मात्र, राज्यात महायुती सरकार येऊन 6 महिने होत आले, त्यातच एक अर्थसंकल्पीय अधिवेशनही पार पडलं. मात्र, लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार हा प्रश्न अनुत्तरीत आहे. त्यातच, सरकारमधील मंत्री नरहरी झिरवाळ यांनी 2100 रुपये देण्याचा शब्द दिलाच नव्हता असे म्हटले. तर, आता मंत्री संजय शिरसाट यांनीही स्पष्टपणे भूमिका मांडली आहे. लाडक्या बहिणींना 1500 चे 2100 देता येणार नाही ही वस्तुस्थिती मान्य करावी लागेल, असे शिरसाट यांनी म्हटलं आहे.
राज्यातील सामाजिक व न्याय विभागाचे मंत्री असलेल्या संजय शिरसाट यांनी गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या खात्याला पैसे कमी मिळत असल्याचा दावा केला. विशेष म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी आपल्या खात्याचा पैसा वळविण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे, सरकारमध्येच लाडकी बहीण योजनेवरुन एकवाक्यता नसल्याचे दिसून येते. त्यातच, आज भूमिका मांडताना शिरसाट यांनी स्पष्टच शब्दात लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये देण्यात येणार नसल्याचेही स्पष्ट केले.