
बीड (रिपोर्टर)ः- बीड-पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांनी अवैध धंदे आणि गैरकारभारावर निर्बंध आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले असताना दुसरीकडे त्यांच्याच खात्यातील कर्मचारी कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे काढत आहेत. अन्य कुठे नव्हे तर थेट पोलीस अधिक्षक यांच्या निवासस्थानीच काल (दि. 4) रात्री 9 ते 9.30 च्या दरम्यान एका कर्मचार्याला एसपींनीच गांजा पिताना रंगेहात पकडले. या प्रकारामुळे आता पोलीस दलाचीच प्रतिमा मलीन होत असून रोजच्या घटनांनी जिल्हयातील पोलीस दलाची बदनामी कमी होते की काय त्यात नव्याने भर पडली आहे.
शिवाजी नगर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार बाळू बहिरवाळ असे त्या कर्मचार्याचे नाव आहे. सध्या पोलीस अधिक्षक यांच्या निवासस्थानच्या डागडुजीचे काम सुरु असल्याने ते सध्या गेस्ट हाऊसमध्ये मुक्कामी आहेत. काल रात्री 9 ते 9.30 च्या दरम्यान ते आपल्या कुटुंबासह घराचे काम पाहण्यासाठी गेले होते. यावेळी बाळू बहिरवळ हा दरवाजा लाऊन आता गांजा पित होता. पोलीस अधीक्षकांनी स्वतः खूप वेळ दरवाजा ठोठावून ही दार उघडत नसल्याने त्यांना शंका आली. काही वेळानंतर बाळूने दरवाजा उघडला तेंव्हा आत गांजाचा वास आला. दरम्यान तात्काळ पोलीस अधिक्षक यांनी शिवाजी नगर पोलिसांना बोलावून बाळू बहिरवाळची जिल्हा रुग्णालयात तपासणी करण्याचे आदेश दिले. यावेळी बाळूने गांजाचे सेवन केल्याचे अहवालातून समोर आल्यानंतर त्याच्यावर शिवाजी नगर पोलीस ठाण्यात एनडीपीएस अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान आरोपीला सेवेतून निलंबित करण्यात आल्याची देखील माहिती असून थेट पोलीस कर्मचारीच कायद्याचे पालन करणार नसतील तर जिल्हयात खाकीचा धाक राहणार कसा? हा प्रश्न आता निर्माण होत आहे.
एसपींचे काम चांगले पण…
जिल्हयात आल्यापासून पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांनी पोलीस दलाची प्रतिमा सुधारण्यासाठी मोठी मेहनत घेतली. अनेक निर्णय घेऊन पोलिसांची वेगळी प्रतिमा करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. अजूनही ते अनेक समाजउपयोगी निर्णय घेऊन कायद्याची भीती निर्माण करत असताना दुसरीकडे काही मूठभर अधिकारी आणि कर्मचारी खाकीच्या प्रतिमेला डाग लावण्याचे काम करत आहेत.