विज पडून दोघा जणांचा मृत्यू, अनेक ठिकाणी शेती पिकांचे नुकसान
बीड, (रिपोर्टर) ः पाच दिवसांपासून मराठवाड्यात वादळी वार्यासह पाऊस पडत आहे. याचा फटका शेती पिकांना बसत आहे. काल रविवारी मराठवाड्याच्या लातूर, बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई व हिंगोली जिल्ह्यातील काही भागांमध्ये वादळी वार्यासह पाऊस झाला. यामध्ये लातूर येथील एकाचा वीज पडून मृत्यू झाला आहे तर दुसरी घटना अंबाजोगाई तालुक्यात घडली. वादळी वार्यामुळे शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. विशेष करून फळबागांचे नुकसान झाले.
मराठवाड्यामध्ये गेल्या 5 दिवसांपासून कोठे न कोठे वादळी वार्याचा पाऊस पडत आहे. याचा फटका शेती पिकांना बसला आहे. काल रविवारी बहुतांश ठिकाणी पाऊस पडला. छत्रपती संभाजीनगर याठिकाणी जोरदार पावसाच्या सर्या बरसल्या आहेत. तसेच हिंगोली जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पाऊस पडला. या पावसामुळे शेतकर्यांची शेतात वाळू घातलेल्या हळदी पिकाचे नुकसान झाले. हिंगोलीसह लातूर शहर व परिसरात देखील पाऊस पडला आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई भागातील अनेक ठिकाणी पावसाने झोडपले. या वादळी वार्यात विज पडून दोघा जणांचा मृत्यू झाला. अंबाजोगाई तालुक्यातील सोयगाव व लातूर जिल्ह्यातील हंरगुळ खुर्द येथे विज पडली आहे. सोयगाव येथील शेतमजूर डिगांबर गायकवाड (59) व हरंगुळ खु. येथील राहुल चंद्रकांत जाधव (22) यांचा मृत्यू झाला. सुगाव येथील मोहसिन सत्तार पठाण यांच्या शेतातील म्हशीवर विज पडल्याने म्हैस दगावली आहे. एकूणच वादळी वार्यामुळे शेतकर्यांची तारांबळ उडालेली होती. पाच दिवसांमध्ये जो अवकाळी पाऊस पडला त्यामध्ये मराठवाड्यातील शेतकर्यांसह राज्यातल्या इतर ठिकाणच्या शेतकर्यांचे बरेच नुकसान झालेले आहे.