मुंबई (रिपोर्टर) शिवसेनेचे खासदार संजय राऊत संजय राऊत यांना अखेर रात्री ईडीनं अटक केली. राऊत यांच्या अटकेनंतर शिवसेना राज्यभर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. माजी मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे यांचा देखील झंझावाती दौरा सुरु आहे. महाराष्ट्राचा आवाज दाबण्यासाठी हे सर्व सुरु आहे. संजय राऊतांची अटक हे कटकारस्थान आहे, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. बंडखोरी झालेल्या 40 जागांवर निवडणुका घ्या,सत्ता जिंकते की सत्य जिंकते कळू द्या, असं आव्हान आदित्य ठाकरेंनी दिलं आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले की, ठाकरे परिवार कधीही संपणार नाही. समोर असलेलं हे ठाकरे परिवार आहे. कोकणाचा आवाज म्हणजे शिवसेनेचा आवाज आहे. बंडखोरांनो राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे जा असं म्हणत त्या 40 लोकांसाठी अजूनही मातोश्रीचे दरवाजे अजूनही उघडे आहेत, असंही आदित्य ठाकरे म्हणाले. आदित्य ठाकरे म्हणाले की, दोन मंत्र्यांचे मंत्रिमंडळं आहे. कोण मुख्यमंत्री कोण उपमुख्यमंत्री कळत नाही. शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार आहे, असं ते म्हणाले.
शिवसंवाद यात्रेच्या
दुसर्या टप्प्याला सुरुवात
एकीकडे संजय राऊत यांच्या अटकेमुळे शिवसेनेला हादरा बसला असताना शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आज तळकोकणातून त्यांच्या शिवसंवाद यात्रेच्या दुसर्या टप्प्याला सुरुवात करत आहेत. आदित्य ठाकरे आज सकाळी चिपी विमानतळावर पोहोचले. तर संध्याकाळी आदित्य ठाकरे यांचा कोल्हापुरात मेळावा आहे.