
सिरसाळा बसस्थानक आता हायफाय होणार!
सिरसाळा (रिपोर्टर) :- माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. परळी तालुक्यातील सिरसाळा येथील बसस्थानकाचे आता आधुनिकीकरण होणार असून, ते लवकरच ’हायफाय’ बसस्थानक म्हणून ओळखले जाईल. मुंडे यांच्या मागणीची दखल घेत प्रशासनाने या कामाला मंजुरी दिल्याने सिरसाळा परिसरातील प्रवाशांना लवकरच अद्ययावित सुविधांचा लाभ घेता येणार आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून सिरसाळा बसस्थानकाच्या दुरवस्थेबाबत प्रवाशांकडून तक्रारी येत होत्या. याची दखल घेत धनंजय मुंडे यांनी संबंधित विभागाकडे बसस्थानकाच्या आधुनिकीकरणाची मागणी लावून धरली होती. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच हा प्रश्न मार्गी लागल्याचे बोलले जात आहे.या आधुनिकीकरणामुळे सिरसाळा बसस्थानकात प्रवाशांसाठी प्रतीक्षालय, पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छतागृहे, आणि इतर आवश्यक सुविधा अद्ययावित करण्यात येतील. यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होण्यास मदत होईल.
दरम्यान, या विकासकामाचे श्रेय घेण्यासाठी काही जण पुढे येत असले तरी, हे यश केवळ धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांचे फळ असल्याचे सिरसाळा ग्रामपंचायत चे सरपंच सोहेल पठाण, माजी सरपंच अक्रमखान पठाण, माजी ग्रा.प.स.फेरोज भाई पठाण, रफिक भाई बागवान,शेख रफिक भाई,शेख नय्यूम भाई,शेख नदीम, सांय दै.बीड सिटिझन चे पञकार रफिक पठाण आणि स्थानिक नागरिकांकडून सांगितले जात आहे. फुकटचे श्रेय कोणी घेऊ नये, अशी भूमिका मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे, ज्यामुळे या विकासकामावरून श्रेयवादाची चर्चा सुरू झाली आहे.