मुंबई (रिपोर्टर) शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी आज विधान भवनाच्या पायर्यांवर शिंदे सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. गद्दार सरकारचा धिक्कार असो, ईडी सरकार हाय हाय, अशा घोषणाबाजीनं विरोधकांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला. पण या सर्व घोषणाबाजींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना बाईट देताना केलेल्या घोषणाबाजीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
विधान भवनाच्या पायर्यांवर सरकार विरोधात विरोधकांची घोषणाबाजी सुरू होती. यावेळी सत्ताधारी पक्षातील सुधीर मुनगंटीवार विधानभवनात जात असताना धनंजय मुंडे यांनी सुधीरभाऊंना कमी दर्जाचं खातं देणार्या सरकारचा धिक्कार असो, अशी घोषणाबाजी केली आणि विरोधीपक्षातील सर्व आमदारांनीही पाठिंबा देत सत्ताधार्यांना डिवचलं. इतकंच नव्हे, तर शिंदे गटातील नाराज आमदार संजय शिरसाट दिसताच धनंजय मुंडे यांनी संजय शिरसाट यांना मंत्रीमंडळात स्थान न देणार्या सरकारचा धिक्कार असो, अशी घोषणाबाजी केली. तर आशिष शेलार येताच शेलारांना मंत्रीपद न देणार्या सरकारचा धिक्कार असो अशी टिप्पणी धनंजय मुंडे यांनी केली. लोकशाहीचा खून करणारं सरकारधनंजय मुंडे यांनी यावेळी सरकारवर जोरदार हल्लाबोल करताना शिंदे-फडणवीस सरकार लोकशाहीचा खून करणारं सरकार असल्याचं म्हटलं. तसंच राज्यातील प्रश्नांवर दुर्लक्ष करणारं सरकार असल्याचंही मुंडे म्हणाले. लोकांनी गुड मॉर्निंग म्हणावं की काय म्हणावं हा ज्याच्या त्याचा अधिकार आहे, असं म्हणत धनंजड मुंडे यांनी फोन कॉलवर हॅलो ऐवजी वंदे मातरम म्हणण्याच्या निर्णयाचा निषेध व्यक्त केला.
आले रे आले, गद्दार आले;
शिंदे गटाच्या आमदारांवर हल्लाबोल
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर विधीमंडळ अधिवेशनाला पहिल्यांदाच शिंदे-फडणवीस सरकार सामोरे जात आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच विरोधकांनी विधानभवनाच्या परिसरात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी शिंदे गटाच्या आमदारांवर शिवसेना व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी घोषणाबाजी करत निशाणा साधला. शिंदे गटाचे आमदार विधानभवनात येत असताना ’आले रे आले, गद्दार आले’ अशी घोषणाबाजी केली.
विधानसभेच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहाबाहेर विरोधक आक्रमक दिसले. विरोधकांनी विधानभवनाच्या पायर्यांवर जोरदार घोषणाबाजी केली. राज्यात ओला दुष्काळ लागू करा, शेतकर्यांना नुकसान भरपाई द्यावी आदी मागण्यांबाबत विरोधकांनी घोषणाबाजी केली. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आमदारांकडून ही घोषणाबाजी सुरू होती. या दरम्यानच, शिंदे गटाचे आमदार विधानभवनात एकाच वेळी जात होते. त्यांना पाहून विरोधकांनी ’आले रे आले, गद्दार आले’ अशी घोषणा देण्यास सुरुवात केली.