माजलगाव (रिपोर्टर) पत्नीच्या जाचाला कंटाळून एका 25 वर्षीय पतीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचा प्रकार माजलगाव शहरामध्ये घडला. आत्महत्या करण्यापूर्वी पतीने व्हिडीओ शेअर केला. त्या व्हिडीओमध्ये त्याने आपल्या आत्महत्येस कशी पत्नी जबाबदार आहे? याची माहिती सांगितली. या घटनेने बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. दरम्यान याप्रकरणी पत्नीवर गुन्हा दाखल करण्यास माजलगाव पोलिस टाळाटाळ करत असल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात आले.
आकाश सुरेश मुळे (वय 25) या तरूणाने पत्नीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी आकाश याने सोशल मिडीयावर एक व्हिडीओ शेअर केला. परमेश्वराकडे जावून मी त्याला मागणी करेल की पून्हा माणसाचा जन्म मला देवू नको, घरातील सगळे चांगले आहेत, पत्नी तिच्यावर मी खूप प्रेम केले पण तिचे प्रेम दुसर्यावर आहे. म्हणून मी स्वत:ला संपवत आहे. असे या तरूणाने व्हिडीओमध्ये म्हटले आहे. या घटनेने माजलगाव शहरात एकच खळबळ उडाली. ही आत्महत्येची घटना दोन दिवसापूर्वी जायकवाडीच्या उजव्या कालव्याच्या परिसरामध्ये घडली. याप्रकरणी पत्नीविरोधात माजलगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी मात्र याबाबत गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली असल्याचे सांगण्यात येते.