महाराष्ट्राच्या राजकारणाचे वस्त्रहरण
मुंबई (रिपोर्टर) महाराष्ट्र विधानभवनाच्या पायर्यांवर आजपर्यंतच्या अधिवेशनात विरोधी पक्षाचे आमदार सत्ताधार्यांविरोधात घोषणाबाजी करायचे. सरकारविरोधातील रोष आणि आपल्या मागण्या घोषणाबाजीच्या रुपाने मांडून सत्ताधार्यांना जेरीस आणायचे. पण आज महाराष्ट्र विधानभवनाच्या पायर्यांवर अभूतपूर्व चित्र पाहायला मिळालं. आज सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनीच विरोधकांना घेरण्याचा प्लॅन आखला. त्यानुसार भाजप आणि शिंदे गटाच्या आमदरांनी ठाकरे-पवारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत विधिमंडळ परिसर दणाणून सोडला. सत्ताधार्यांच्या घोषणाबाजीने विरोधी पक्षाचे आमदार चिडले. त्यांनीही थेट सत्ताधार्यांना भिडत त्यांच्यासमोरच जोरदार घोषणाबाजी केली. आमदार अमोल मिटकरी, रोहित पवार, चेतन तुपे हे राष्ट्रवादीचे आमदार सत्ताधार्यांना भिडण्यात अग्रभागी होते. यादरम्यान सत्ताधारी पक्षाचे आमदार महेश शिंदे आणि मिटकरी यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. व्हिडीओत मिटकरी महेश शिंदे एकमेकांना गुद्दे घालत असल्याचं दिसून येत आहे. इतरही आमदारही एकमेकांना भिडल्याने विधिमंडळाच्या परिसरात प्रचंड गोंधळ माजला होता.
महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी आज अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. विधानभवनाच्या पायर्यांवर सत्ताधारी शिंदे गटातील आमदार आणि विरोधी पक्षातील आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली. गेल्या चार दिवसांमध्ये विरोधकांनी झोंबरी घोषणाबाजी करून सत्ताधार्यांना जेरीस आणले होते. त्यामुळे बुधवारी सकाळपासून भाजपचे आणि शिंदे गटाचे आमदार विधिमंडळाच्या पायर्यांवर आंदोलन करत होते. कोव्हिड भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आमदारांनी बॅनर्स झळकावले. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी रोहित पवार आणि अमोल मिटकरी यांच्या नेतृत्त्वाखालील मविआचे आमदारही त्याठिकाणी आले. मविआच्या आमदारांनीही फलक झळकावत घोषणाबाजी करायला सुरुवात केली. याचदरम्यान सत्ताधारी-विरोधी पक्षाचे आमदार एकमेकांना भिडले.
राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेच्या आमदारांनी पन्नास खोके एकदम ओक्के, ओला दुष्काळ जाहीर करा, गाजर देणं बंद करा, पूरग्रस्तांना मदत करा, अशी घोषणाबाजी सुरु केली होती. दुसर्या बाजूला लवासाचे खोके बारामती ओक्के, वाझेचे खोके मातोश्री ओक्के अशी घोषणाबाजी शिंदे गट आणि भाजपचे आमदार करत होते. या घोषणाबाजीदरम्यान अचानक दोन्ही गटामध्ये बाचाबाची सुरु झाली आणि काही कळायच्या आतच दोन्ही गटामध्ये धक्काबुक्की सुरु झाली, मिटकरी-शिंदेंनी एकमेकांना गुद्दे घातले. रोहित पवारांचीही कुणीतरी आमदाराने कॉलर पकडली होती. यावेळी रोहित पवारही प्रचंड संतापलेले पाहायला मिळाले.
अमोल मिटकरी यांची मुख्यमंत्री
एकनाथ शिंदेंकडे तक्रार विधान भवनाच्या पायर्यांवर राडा झाल्यानंतर अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली आहे. सुरुवातीला महेश शिंदे यांनी शिवीगाळ केल्याची तक्रार अमोल मिटकरी यांनी केली आहे. विधान भवनाच्या पायर्यांवर अमोल मिटकरी आणि महेश शिंदे एकमेकांमध्ये भिडले होते. मिटकरी यांनी सत्ताधारी आमदारांनी धमकावलं असल्याचं देखील म्हटलं आहे.अजित पवार काय म्हणाले…
या गोंधळाच्या काहीच मिनिटं आधी बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, 50 खोके, एकदम ओक्के ही घोषणा त्यांना एवढी जिव्हारी लागली की ते नाराज झालेले दिसत आहेत. यामुळंच त्यांच्यातील काही आमदार आज विधिमंडळातील पायर्यांवर आलेत. त्यांच्या या वागण्यानं हे निष्पन्न झालं आहे की, त्यांच्या विरोधात दिलेल्या घोषणा त्यांच्या मनाला लागल्या आहेत, असं अजित पवार म्हणाले.कुणी अंगावर आलं तर आम्ही शिंगावर घेऊ
भरत गोगावले यांचा इशारा
हा गोंधळ घडला त्यावेळी तिथं उपस्थित असणारे शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले म्हणाले की, आमच्यावर विरोधक आरोप करत होते. आता आम्ही त्यांच्या भ्रष्टाचारावर आवाज उठवण्यासाठी पायर्यावर आंदोलन केलं. आम्ही कुणाला पाय लावत नाही. आम्हाला कुणी पाय लावत असेल तर आम्ही सोडणार नाही. कुणी अंगावर आलं तर आम्ही शिंगावर घेऊ, असं ते म्हणाले. आम्ही कुणाच्या आत जात नाहीत, आमच्या आत कुणी येऊ नये, असं गोगावले म्हणाले. आमच्या मार्गात आलं तर आम्ही सोडणार नाही, असं ते म्हणाले. त्यांनी आम्हाला धक्काबुक्की नाही केली, आम्ही त्यांना धक्काबुक्की केली, असंही गोगावले म्हणाले. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत, आम्ही डरफोक नाहीत, असं ते म्हणाले.