विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान, शाळेला शिक्षक देण्याची ग्रामस्थांची मागणी
धारूर (रिपोर्टर) तालुक्यातील गापाळपूर जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत वर्ग आहेत. या शाळेत तब्बल 171 विद्यार्थी ज्ञानार्जन करतात. मात्र त्यांना शिकवण्यासाठी केवळ तीनच शिक्षक आहेत त्यातही एक मुख्याध्यापक आहे. त्यामुळे या शाळेला आणखी शिक्षक द्यावेत, अशी मागणी गोपाळपूर ग्रामस्थांनी केली आहे.
धारूर तालुक्यातील गोपाळपूर येथे जिल्हा परिषदेची शाळा आहे. त्याठिकाणी तब्बल 171 विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेतात मात्र शासनाच्या उदासीनतेमुळे येथे केवळ तीन शिक्षक आहेत. त्यातही एक मुख्याध्यापक आणि दोनच शिक्षक आहेत. गोपाळपूर गावाच्या आजुबाजुला वस्तीशाळा आहेत. त्याठिकाणी एका वस्तीवर सहा विद्यार्थी आणि दोन शिक्षक आहेत. दुसर्या वस्तीवर 10 विद्यार्थी आणि दोन शिक्षक आहेत. इतर ठिकाणी चार-पाच विद्यार्थ्यांसाठी दोन-दोन शिक्षक आहेत मात्र गोपाळपूर जिल्हा परिषद शाळेत 171 विद्यार्थी असताना केवळ तीन शिक्षक असल्याने येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे या ठिकाणी शिक्षक द्यावेत, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.