दिल्ली (वृत्तसेवा) शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर हे आमचे प्रेरणास्थान आहेत. शिवाजी महाराज हे कधीच दिल्लीसमोर झुकले नाहीत. बाजीराव पेशवे यांनी इथूनच दिल्लीला आव्हान दिले. पेशव्यांनी याच तालकटोरा स्टेडियममध्ये तळ ठोकला होता. असे म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट मोदी सरकारसमोर झुकणार नसल्याचा इशारा दिला आहे.
दिल्लीत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिवेशन होत आहे. राष्ट्रवादीचे हे आठवे अधिवेशन असून, शरद पवारांच्या उपस्थिती हे अधिवेशन पार पडत आहे. यासाठी देशभरातील पदाधिकार्यांची उपस्थिती देखील पाहायला मिळत आहे.
2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष सक्रिय झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने देखील महाराष्ट्राबाहेर पक्षाचा विस्तार करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस कर्नाटक आणि हरियाणात ताकदीने पक्षविस्तार करण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला यापूर्वी महाराष्ट्राबाहेर केरळ, लक्षद्वीप, गुजरात आणि झारखंडमधील निवडणुकांमध्ये काही जागांवर विजय मिळालेला आहे.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांची राष्ट्रीय पक्ष ही ओळख प्रस्थापित करायची आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने नवी दिल्लीतील तालकटोरा मैदानावर दोन दिवसांचे पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित केले आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी शरद पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. शरद पवार हे आता पुढील चार वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपदी शरद पवार यांची फेरनिवड करण्यात आली आहे. शरद पवार यांना पुढील चार वर्षासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष करण्यात आले आहे. नवी दिल्लीतील तालकटोरा मैदानात सुरू असलेल्या राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अधिवेशनात हा निर्णय घेण्यात आला.