मुंबई (रिपोर्टर) मुख्यमंत्र्यांची काल पैठण येथे सभा झाली. या सभेत ते महाराष्ट्रासाठी काय व्हिजन मांडतील, मराठवाड्यासाठी काय देतील याकडे जनतेचे लक्ष होते. मात्र, ते गेल्या 2-3 महिन्यांत झालेल्या सत्तांतरावरच बोलत राहिले. आमचे बंड कसे योग्य होते हे जनतेला पटवून देण्यातच मुख्यमंत्र्यांचा वेळ गेला, अशी टीका राष्ट्रवादीचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे.
तपासे पुढे म्हणाले, टीकाकार टीका करणारच. अजूनपर्यंत घटनापीठाने सरकारला मान्यता दिलेली नाही. त्यामुळे जोपर्यंत यास सुप्रिम कोर्टाकडून घटनात्मक मान्यता येत नाही, तोपर्यंत हे सरकार असंवैधानिक आहे. असेच आम्ही बोलत राहणार. तुमच्या भाषणातून राज्याला काय फायदा होणार? याबाबत मुख्यमंत्री काहीही बोलले नाहीत. अजित दादा, सुप्रिया सुळे, जयंत पाटील काय करतात, यावरच ते पूर्णवेळ बोलत राहिले. तपासे म्हणाले की, आलेल्या जनतेसमोर आमचे बंड कसे योग्य होते, ते कसे वस्तुस्थितीला धरून होते यावर ते बोलत राहिले. वास्तविक महाराष्ट्रातील जनता दूधखुळी नाही. या सभेला कशाप्रकारे गर्दी आणली गेली हे संबंध महाराष्ट्राला माहित आहे. बंडखोरीचे, महाविकास आघाडीचे कृत्य चुकीचे होते. आगामी काळात तुमचे 50 पैकी 45 आमदारही निवडून येणार नाही. हे मी खात्रीने सांगू शकतो असेही ते म्हणाले.