बीड(रिपोर्टर) राज्यात सर्वत्र लंपीच्या आजाराने हा हाकार उडवून दिल्याने शेतकर्यांचे धन म्हणून ओळखले जाणारे जनावरे मृत्यूच्या दाढेत उभे आहेत. अशा गंभीर स्थितीत जनावरांना लसीकरण करणे नितांत गरजेचे आहे. मात्र अनेक ठिकाणी अद्याप लसिकरण सुरू झालेले नाही तर अनेक पशूवैद्यकीय रुग्णालयामध्ये लसच उपलब्ध नाही. त्यामुळे शेतकर्यात दहशत आणि भितीचे वातावरण निर्माण झाले असून लसीचा तुटवडा असतांनाही प्रशासन अद्याप शासन दरबारी लस मागण्यासाठी पुढाकार घेत नाहीत. त्यामुळे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा शेतकर्यांचं धन वाचविण्यासाठी पुढाकार घ्या, जास्तीत जास्त लस बीड जिल्ह्यासाठी उपलब्ध करा आणि शेतकर्याचं धन वाचवा अशी मागणी सर्वस्तरातून होत आहे.
बीड जिल्ह्याला सध्या पालकमंत्री नसल्याने संकटाच्या प्रसंगी सर्वसामान्य शेतकर्यांनी दाद कोणाकडे मागायची, मदत कोणाकडे मागायची? हा प्रश्न उपस्थित असतांना बीड जिल्ह्यावर महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यासारखंच लंम्पीचं संकट कोसळलं. आष्टी,पाटोदा, शिरूर, गेवराई, वडवणी, बीड सह अन्य तालुक्यामध्ये शेतकर्यांच्या जनावरांना लंम्पी ग्रासून टाकत आहे. लंम्पीचा आजार सुरू झाल्यापासून जिल्ह्यामध्ये दुग्ध व्यवसायावर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे. शेतकरी या संकटापुढे हतबल झाला असून लंम्पीची दहशत आणि शेतकर्यांमध्ये पसरलेली भिती दुर करण्यासाठी जिल्हा प्रशसानाकडून लंम्पीबाबत जनजागरण होणे नितांत गरजेचं आहे. लंम्पी झालेल्या जनावरांचे दुध खावे की न खावे, लंम्पीग्रस्त जनावराच्या दुधाने मानवाला त्रास होतो का? लंम्पी आजार अटोक्यात आणण्यासाठी शेतकर्यांनी कुठल्या उपाययोजना करायला हव्यात यासह अन्य प्रकारची माहिती प्रशासनाकडून गावागावात द्यायला हवी. मात्र अद्याप या संकटाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे एवढ्यावरून दिसून येते. जिल्ह्यातल्या बहुतांशी पशुवैद्यकीय रुग्णालयामध्ये लंम्पीबाबतची लसच उपलब्ध नाही. बीड जिल्ह्यातल्या जनावरांचे लसीकरण करण्यासाठी जास्तीत जास्त लस मागवून घेवून लसीकरण मोहिम तात्काळ सुरू करत जनजागृती सुरू करावी अशी मागणी सर्वस्तरातून जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्याकडे करण्यात येत आहे.