बीड (रिपोर्टर) आपण देशाचा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. मराठवाडा मुक्तीसंग्रामही मोठ्या उत्साहात साजरा करत आहोत. मराठवाड्याला निजामाच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपली आहुती दिलेली आहे. अशा स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानातून आपल्याला हे बहुमुल्य स्वातंत्र्य प्राप्त झाले आहे. त्याचा आज आपण अमृत महोत्सव साजरा करत असताना आमच्या सरकारने राज्यातील 75 हजार युवकांना नोकर्या देण्याचा संकल्प केला आहे, असे प्रतिपादन राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांनी केले आहे.
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे मुख्य शासकीय ध्वजारोहन आज राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. राज्यात शिंदे गट आणि भाजपाचे सरकार आल्यापासून अनेक विकासकामे करण्याचे निर्णय घेतलेले आहेत. ही सर्व कामे राज्यातील जनतेच्या विकासाची आहेत. देशाचा अमृत महोत्सव साजरा करत असताना मराठवाडा हा प्रदेश निजामाच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या जीवाची आहुती दिली आहे. अशा सर्व स्वातंत्र्यसैनिकांना मी आदरांजली वाहतो. सोबतच जे स्वातंत्र्य सैनिक सध्या हयात आहेत त्यांना माझे शतश: नमन आहे. राज्य सरकार हे आरोग्य, रोजगार हमी, कृषी क्षेत्रात भरीव कामगिरी करण्यासाठी अनेक निर्णय घेत आहे. बीड जिल्ह्यातील सत्तेचाळीस मंडळातील सोयाबीन पिकाचा 25 टक्के अग्रीमची रक्कम तात्काळ शेतकर्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी प्रशासन आणि विमा कंपनी गतीने काम करत आहे. जिल्ह्यातील अनेक जनावरांना संसर्गजन्य अशा लम्पी रोगाने ग्रासले आहे. त्या जनावरांचे सामुहिक लसीकरण करण्याचा निर्णय राज्याच्या पशुधन विभागाने घेतला आहे. जिल्ह्यात जनावरांचे लसीकरण करण्यासाठी कॅम्प लावून हे लसीकरण करण्यात येणार आहे. या वेळी त्यांनी विरोधकांचा समाचार घेताना विरोधी पक्षाचं कामच टीका करण्याचं असतं. त्यांनी टीका केली तरच ते चर्चेत राहतात. औरंगाबादचे चंद्रकांत खैरे यांना मातोश्रीवर दोन-दोन दिवस प्रवेश मिळत नव्हता म्हणून ते आमच्यावर बेछुट आरोप करतात कारण त्यांना आता मातोश्रीवर सांगण्यासारखे काही तरी कारण पाहिजे, म्हणून ते काल पैठण येथे झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या मेळाव्यावर पैसे देऊन लोक आणल्याची टीका केली, मात्र हे लोक आमचे विकास कामे बघून आमच्यावर प्रेम करतात म्हणून आले होते, असेही भुमरे यांनी या वेळी सांगितले. भुमरे यांच्या हस्तेच मराठवाडा स्वातंत्र्य संग्रामातील हुतात्मा स्मृती स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. या वेळी आ. संदीप क्षीरसागर, जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर, शिवसेनेचे बंडखोर गटाचे जिल्हाध्यक्ष कुंडलिक खांडे, जि.प.चे माजी उपाध्यक्ष गंगाधर घुमरे आणि बंडखोर गटातील अनेक शिवसैनिक या वेळी उपस्थित होते.