कडा-देवळाली रोडवरील घाटापिंप्री येथील घटना
आष्टी (रिपोर्टर) सर्व कुटुंब शेतीच्या कामासाठी गेले असता भरदुपारी अज्ञात चोरट्याने बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत कपाटात ठेवलेले तीन तोळ्याचे दागिन्यांसह तीस हजार रुपये लंपास केल्याची घटना कडा-देवळाली रोडवरील घाटापिंप्री येथे काल दुपारी घडली.
आष्टी तालुक्यातील कडा-देवळाली रोडवरील घाटापिंप्री येथील रस्त्यावर जगताप वस्तीवर दत्तु जगताप हे आपल्या कुटुंबासह राहतात. ते काल शेतीच्या कामानिमित्त सर्व कुटुंब दुपारी साडेतीन वाजता शेतात गेले असता अज्ञात चोरट्यांनी याचा फायदा घेत बंद घर फोडले. कपाटातील तीन तोळे सोन्यासह तीस हजार रुपये लंपास केले. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अंभोरा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रवी देशमाने, अमलदार शिवदास केदार, अमोल सिरसाट यांनी भेट देऊन पाहणी केली. भरदिवसा रहदारीच्या रस्त्यावरील घर फोडल्याने नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरटे दुचाकीवरून आल्याचे समजते.