दु:खद एनडीएआरएफचा जवान शहीद
डॉ.फफाळ यांचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी घेतली होती जवानाने पाण्यात बुडी
खाली खोल पाण्यात जवान राजू मोरे अडकले, तीन तासानंतर त्यांना बाहेर काढले,
घटनास्थळावर जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा तळ ठोकून डॉ. फपाळ यांचा मृतदेह अद्याप तलावातच
माजलगाव (रिपोर्टर) पाहण्यासाठी तलावात गेलेले तेलगाव येथील डॉ. दत्तात्रय फपाळ यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्यानंतर त्यांचा मृतदेह काढण्यासाठी कोल्हापूर येथून मागवण्यात आलेल्या आपत्ती व्यवस्थापन पथकातील राजू मोरे हे तलावातील पाण्यात असलेल्या जाळ्यात अडकून पडल्याची घटना आज सकाळी दहा वाजता घडली. तब्बल तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर राजू मोरे यांना पाण्याबाहेर काढण्यात आपत्ती व्यवस्थापनाच्या अन्य पथकाला यश आले. ऑक्सीजन किट सोबत असल्याने राजू मोरे यांचा तोपर्यंत थोडासा श्वासोश्वास चालू असला होता. घटनास्थळावर उपस्थित डॉक्टरांच्या टीमने त्यांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न केले मात्र अखेर राजू मोरे यांचाही यामध्ये मृत्यू झाला. घटनास्थळी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा हे तळ ठोकून असून मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी असल्याने पोलीस बंदोबस्त घटनास्थळावर मोठ्या प्रमाणावर ठेवण्यात आला आहे. राजू मोरे यांच्या मृत्यूनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून एनडीआरएफच्या पथकातील जवान मोरे हे या ठिकाणी कर्तव्यावर असताना शहीद झाले आहेत.
याबाबत अधिक असे की, काल सकाळी तेलगाव येथील डॉ. दत्तात्रय फफाळ हे तलावामध्ये पोहण्यासाठी गेले होते. त्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी कोल्हापूर येथून सहा सदस्यांचं आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळावर पाचारण करण्यात आलं होतं. रात्री उशीरापर्यंत डॉ.फपाळ यांचा मृतदेह मिळू शकला नाही. आज सकाळी या पथकातील राजू मोरेंसह अन्य एक कर्मचारी मृतदेहाचा शोध घेण्यासाठी ऑक्सिजन किटसह तलावाच्या पाण्यात बुडी घेऊन गेले. एक कर्मचारी वर आला मात्र अर्ध्या एका तासानंतरही राजू मोरे नामक कर्मचारी पाण्याबाहेर येऊ शकला नाही. तो खाली जाळ्याला अडकला. कर्मचार्याला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू झाले. सकाळी दहा वाजता पाण्यात बुडी घेतलेला हा कर्मचारी दुपारी सव्वा एक वाजेपर्यंतही पाण्यात होता. त्यामुळे सर्वांची चिंता वाढली होती. अखेर दीड वाजता कर्मचार्याला बाहेर काढण्यात यश आले. हलकासा श्वासोश्वास त्याचा चालू होता. घटनास्थळावरील डॉक्टरांनी त्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले मात्र राजू मोरे यांचाही या दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनास्थळावर जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्यासह प्रशासनातील अन्य अधिकारी उपस्थित आहेत. अद्याप डॉक्टर फपाळ यांचा मृतदेह बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले नाही. दुर्दैवाने एनडीआरएफच्या पथकातील जवान या ठिकाणी शहीद झाला आहे.
जवान शहीद
जेव्हा केव्हा सर्वसामान्य माणूस संकटात सापडतो, कधी पुराच्या पाण्यात तर कधी तलावाच्या पाण्यात अडकतो तेव्हा त्या सर्वसामान्य माणसाचा जीव वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून एनडीआरएफचे जवान काम करतात. आजही कोल्हापूर येथील एनडीआरएफमध्ये कार्यरत असलेले जवान राजू मोरे हे डॉ. फफाळ यांचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी कर्तव्यावर होते. आज सकाळी जेव्हा ते पाण्यात गेले तेव्हा कोणालाही वाटलं नसेल वाईट बातमी पाण्याच्या वर येईल. दुर्दैवाने राजू मोरे हे कर्तव्यावर शहीद झाले.
आरोग्य सेवक गमावला
तेलगाव येथे वैद्यकीय सेवा देणारे डॉ. दत्तात्रय फपाळ हे काल पोहण्यासाठी गेले आणि त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह अद्याप पाण्याबाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले नाही. घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर लोक जमले असून आरोग्य सेवक गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
जिल्हाधिकारी उतरले पाण्यात
एनडीआरएफचे जवान राजू मोरे हे खोल पाण्यात अडकल्याची माहिती जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांना झाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. बोटीद्वारे ते थेट पाण्यात उतरले. उपस्थित जवानांना मानसिक बळ मिळावं यासाठी राधाबिनोद शर्मा यांनी त्याठिकाणी तळ ठोकून घटनास्थळाची इत्यंभूत माहिती घेतली. दुर्दैवाने कर्मचार्याचा मृत्यू झाला.
स्थानिक महिलांनी
बुडी घेऊन काढलं एनडीआरएफच्या जवनाला बाहेर
एनडीआरएफचे जवान राजू मोरे हे पाण्यात अडकल्यानंतर त्यांना बाहेर काढण्यासाठी कोल्हापूरसह अन्य ठिकाणावर उपस्थित असलेल्या एनडीआरएफच्या जवानांना त्यांना बाहेर काढण्यात यश येत नव्हते मात्र त्याठिकाणी मच्छिमार करणार्या नर्मदा कचरे नावाच्या महिलेने राजू मोरे यांना बाहेर काढले. मात्र दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला.