पुर्वीपासून शिवसेनेचा दसरा मेळावा होत आला. त्याची सुरुवात स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज्यभरातून शिवसैनिक येत असे. बाळासाहेबांचे विचार मेळाव्यातून ऐकून शिवसैनिक गावाकडे जात होते, ही परंपरा आज पर्यंत सुरुच होती, पण या वर्षी एकाच पक्षाचे दोन मेळावे होत आहेत. शिवसेना पक्ष नेमका कुणाचा याचा निर्णय होणार आहे, धनुष्यबाण चिन्ह कोणाला जाणार हे अजुन निवडणुक आयोगाने घोषीत केलं नाही, पण शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघे ही शिवसेना आपलीच आहे, असा दावा करुन आहेत. याच दाव्यातून आणि चढाओढीतून दसरा मेळावा होत आहे, हे दोन्ही मेळावे म्हणजे दोन्ही नेत्यांची एकमेकांवर कुरघोडी आहे.
शिवसेना पुर्वीची
शिवसेना पक्ष हा आक्रमक आणि थेट भिडणारा म्हणुन ओळखला जात आहे. शिवसेनेच्या या भुमिकेमुळे या पक्षाच्या नादी कुणी लागत नव्हतं. इतर पक्षाचे नेते ही जरा थरकून होते. स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसांच्या हक्कासाठी या पक्षाची स्थापना केली होती. मुंबईत मराठी माणसांची कोंडी होत होती. मराठी माणसांना नौकर्या मिळत नव्हत्या, सन्मान मिळत नव्हता, पण या सगळ्या गोष्टी शिवसेनेमुळे मराठी माणसांना मिळाल्या. नंतरच्या कार्यकाळात शिवसेना बदलत गेली. वेगवेगळ्या पध्दतीने राजकीय भुमिका शिवसेनेने घेतल्या. महाराष्ट्रात अनेक वर्ष काँग्रेस पक्षाची सत्ता होती. त्यामुळे इतर पक्षांना तितका वाव राज्यात मिळत नव्हता. कॉग्रेसच्या चुकीच्या धोरणावर शिवसेना सडेतोड आसूड ओढत होती. राजकीय नेत्यांवर बाळासाहेब शब्दांचे बाण टाकत होते. अगदी शरद पवार यांच्यावर देखील टोकाची टिका बाळासाहेबांंनी केलेली आहे. बाळासाहेबांनी अनेक राजकीय नेत्यावर आरोप, प्रत्यारोप केले, मात्र त्यात विखार नव्हता. कोणत्या ना, कोणत्या कारणावरुन बाळासाहेब आणि इतर विरोधक एकाच व्यासपीठावर येत असे, शरद पवारांचं अनेक कार्यक्रमातून बाळासाहेबांनी कौतूक देखील केलेलं आहे. आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधी यांना बाळासाहेबांनी समर्थन दिलं होतं. बाळासाहेबांनी काढलेल्या व्यंगचित्राचं राज ठाकरे यांनी पुस्तक छापलं होतं. त्याचा भव्यदिव्य कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, शरद पवार, जॉर्ज फर्नाडिस पासून ते प्रमोद महाजनसह अन्य नेते उपस्थित होते. त्यावेळी भाजपा लवून होता. बाळासाहेब व शिवसेनेच्या बाबतीत आदरच व्यक्त केला जात होता. आज तो आदर राहिला नाही. भाजपात विखार निर्माण झाला. आजचा भाजपा पुर्वी सारखा राहिला नाही. आजच्या भाजपात नवे नेते उदयाला आले आहेत. मोदी बाळासाहेबां समोर हात जोडून उभे राहत होते. आज तेच मोदी शिवसेना संपवू लागले. अमित शहा मुंबईत येवून शिवसेनेला आव्हान देत असतात. आज बाळासाहेब असते तर ही हिंमत भाजपावाल्यांची झाली असती का?
असं काय झालं?
विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इतकं मोठं बंड करतील याचा विचार कदाचीत उध्दव ठाकरे यांनी कधीच केला नसेल. शिवसेना हा वाघांचा पक्ष म्हणुन ओळखला जात आहे. शिवसेनेच्या विरोधात जो कोणी बंड करेल तो राजकीय जीवनात यशस्वी होत नाही हा आज पर्यंतचा इतिहास आहे. छगन भुजबळ यांनी पहिले बंड केले होते. भुजबळांना पवारांची साथ होती, म्हणुन भुजबळ राजकारण स्थिर झाले. भुजबळांच्या पाठीशी पवार नसते तर भुजबळ राजकारणात प्रभावशाली ठरले नसते, तरी मध्यंतरी भुजबळांवर कारवाई झाली होती. त्यांना दोन वर्ष जेलमध्ये जावे लागले. भुजबळा नंतर ज्यांनी, ज्यांनी शिवसेनेच्या विरोधात बंड केले ते आज राजकारण तितके यशस्वी झाले नाहीत. काही बंडखोरांचे नाव आजच्या पिढीला माहित नाही. एकनाथ शिंदे यांचे बंड विचार करायला लावणारे आहे. एकाच वेळी शिवसेनेचे 40 आमदार फुटतात म्हणजे ही सगळ्यात मोठी बंडखोरी आहे. विशेष करुन मंत्री असतांना काही जण शिंदे यांच्या सोबत गेलेले आहेत, याचा अर्थ नेमका कसा काढायचा? हे मंत्री भीतीने गेले की, त्यांना आमिष दाखवण्यात आले. उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या मध्ये असं काय झालं, जे की, शिंदे यांनी अख्खी शिवसेनाच फोडली. शिंदे हे एकटे एवढं मोठं धाडस करु शकत नाही, कारण त्यांच्या पाठीशी भाजपाचा हात असावा? भाजपा नसती तर शिंदे यांनी बंड केलेचं नसते. बंड केलं असतं तरी ते इतकं यशस्वी झालं नसतं? भाजपाने सगळ्या काही गोष्टी घडवून आणल्या आणि राज्यात सत्तांतर केलं. राज्यातील एक प्रादेशीक पक्ष आपलं ऐकत नाही. आपण देशात सत्ताधारी असतांना शिवसेना आपल्याला आव्हान देते याची सल नक्कीच केंद्राला झोंबली असणार म्हणुन शिवसेनेचा अशा पध्दतीने गेम करण्यात आला. कोर्टाची लढाई चालत राहिल तो पर्यंत सत्ता भोगायला मिळाली हा विचार ही शिंदे आणि भाजपाच्या मनात असणार आहे. सर्व प्रकरणाचा निकाल लागायला बराच अवधी लागू शकतो. तो पर्यत शिंदे, भाजपा बर्याच गोष्टी राजकीय घडामोडीतून साध्य करु शकतात? आपलं राजकारण आणखी प्रबळ करु शकतात. मध्यावधी निवडणुका झाल्याच तर त्याची तयारी देखील या दोघांची असू शकते. त्या दिशेने त्यांची वाटचाल असू शकते.
प्रतिष्ठापणाला
मेळावा कोणाचा मोठा होणार हा प्रश्न दोन्हीकडील सैनिकांना पडला असेल. दोन्ही बाजुने मोठे शक्तीप्रदर्शन होत आहे. शिंदे यांच्या मेळाव्याला आतून भाजपाची मदत असणार हे लपून राहणार नाही. शिंदे यांनी आपल्या सर्व समर्थक मंत्र्यांना मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी योग्य त्या सुचना दिलेल्या असतील. आज पर्यंत जे काही मेळावे झाले. त्या मेळाव्याला निवडक शिवसेैनिक राज्यभरातून जात होते. त्यात जिल्हाप्रमुख, तालुका प्रमुख आणि काही हाडाचे कार्यकर्ते, उद्याच्या मेळाव्याला प्रत्येक जिल्हा प्रमुखांना टार्गेट दिलेले असेल. इतकी, इतकी माणसं जमा करा म्हणुन, त्यानुसार दोन्ही गटाचे जिल्हा प्रमुख कामाला लागलेले आहेत. विशेष करुन मंत्र्यावर जास्त भर राहणार आहे. उध्दव ठाकरे हे ही यंदाचा दसरा मेळावा कसा मोठा होईल याकडे जाणीव पुर्वक लक्ष देवून असणार आहे. दरवर्षी पेक्षा या वर्षी जास्त शिवसैनिक आले पाहिजे असाच त्यांचा हट्ट असणार आहे. तशी तयारी त्यांनी जोरदार केली असणार, रोज कोणी, ना कोणी ठाकरे यांना सोडून शिंदे गटात सहभागी होत आहे. अगदी विश्वासू लोक देखील ठाकरे यांच्यापासून दुर होत आहे. दुसरीकडे शिंदे यांच्याकडील नाराज लोक ठाकरे यांच्याकडे येत आहे. जे येतील त्याचं स्वागत दोन्ही गटाकडे होत आहे. एकीकडे राज्यातील महत्वाचे प्रश्न बाजुला पडले. फक्त दसरा मेळाव्याची चर्चा होत आहे. काही ठिकाणी अतिरिक्त पावसाने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले. शेतकर्यांना योग्य ती नुकसान भरपाई मिळाली नाही. विम्याचा प्रश्न मार्गी लागत नाही. बीड सारख्या ठिकाणी सोयाबीनचे नुकसान होऊन देखील शेतकर्यांना विमा देण्यास कंपनी तयार नाही. बेरोजगारीचा प्रश्न सोडवायला हे सरकार तयार नाही. विद्यमान सरकार फक्त राजकारण करुन आपणच कसे चांगले आहोत याचा जोरदार प्रयत्न करत आहे. अशाच पध्दतीने राजकारण होत राहिलं तर राज्यातील जनतेने नेमकं करायचं काय?
शिवसेनेला मंजुरी
शिवसेना आज पर्यंत दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवर घेत आली. यंदा शिवसेनेत फुट पडल्याने दसरा मेळावा नेमका कुठं होणार असा प्रश्न निर्माण झाला होता. ठाकरे आणि शिंदे या दोघांनी शिवाजी पार्कवर दावा केला होता, हे प्रकरण न्यायालयात गेले होते. न्यायालयाने उध्दव ठाकरे यांच्या बाजुने निकाल देत ठाकरे यांना शिवाजी पार्कवर मेळावा घेण्याची परवानगी दिली. पहिली लढाई ठाकरे जिंकले असले तरी इतर लढायात नेमकं काय होतंयं हे सांगता येत नाही. ठाकरे यांना शिवाजी पार्क मैदान देण्यात आल्यानंतर शिंदे यांची अडचण झाली. शिंदे हे बीकेसी संकुलावर मेळावा घेणार आहेत. पंधरा दिवसापासून या दोन्ही मेळाव्याच्या चर्चा होत आहे. मेळाव्यातून दोन्ही नेते नेमकं कोणत्या विचाराचं सोनं लुटतात हे पाहता येणार आहे. मेळव्यात दोन्ही कडून एकमेकांचे वाभाडे काढले जाणार हे नक्कीच आहे. राज्यात दसर्या दिवशी इतर काही मेळावे होत असतात, पण यंदा ठाकरे,शिंदे यांच्या मेळाव्याकडे राज्याचेच नव्हे तर देशाचे लक्ष लागून आहे. मेळाव्यात गर्दी जमवण्यात कोण किती यशस्वी ठरलं हे मेळाव्यातून दिसणार आहे. येत्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा सगळा खटाटोप असणार आहे. मुंबई महापालिका ही शिवसेनेसाठी महत्वाची आहे, ही पालिका भाजपाला हवी आहे. त्यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी भाजपा करणार आहे. शिंदे यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून बरेच कामे भाजपा करुन घेवू शकतो. त्याची सुरुवात मेळाव्याच्या माध्यमातून भाजपाने केली असचं म्हणावं लागेल? शिंदे यांचा तसा मेळाव्याचा संबंध नव्हता, पण शिवसेना आपलीच आहे असा दावा त्यांनी करुन मेळाव्याला सुरुवात केली. शिंदे हे जे करत आहेत ते बाळासाहेबांना मान्य झालं असतं का? शिंदे उठसूठ बाळासाहेब आणि आनंद दिघे यांचे नाव घेवून आपलं राजकारण पुढे रेटण्याचं काम करत आहेत. त्यांना या राजकारणात यश येईल का? हे येत्या काळात दिसून येईल. एकाच पक्षाचे उद्या दोन मेळावे होत आहे हे आश्चर्यकारक नाही का?