बीड (रिपोर्टर) इस्लाम धर्माचे शेवटचे पैगंबर हज़रत मुहम्मद मुस्तफा सल्लल्लाहू अलैही वसल्लम यांच्या जन्मदिनानिमित्त ईद-ए-मिलादुन्नबी चे जुलूस (मिरवणूक) येत्या 9 ऑक्टोबर 2022 इस्लामिक तारीख 12 रबी उल् अव्वल 1444 हिजरी रविवार रोजी सकाळी 08:30 वाजता हज़रत शहेनशाहवली दर्गा येथून काढण्यात येणार असल्याची माहिती केजीएन ग्रुप चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सय्यद मुहम्मद ज़हीरोद्दीन शाह कादरी यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून कळविली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून कोविड – 19 च्या प्रतिबंधामुळे मुहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनी ईद-ए-मिलादुन्नबी दिवशी जुलूस काढता आले नाही. परंतु आता कोविड साठीचे निर्बंध शासन-प्रशासनाकडून हटविण्यात आले आहे. म्हणून आता दरवर्षी प्रमाणे यावेळीही मुहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिना दिवशी साजरी करण्यात येणार्या ईद-ए-मिलादुन्नबी निमित्ताने अज़िमुश्शान मिरवणूक येत्या दिनांक 9 ऑक्टोबर 2022 इस्लामिक तारीख 12 रबी उल् अव्वल 1444 हिजरी रविवार रोजी सकाळी 08:30 वाजता हज़रत शहेनशहावली दर्गा येथून जुलूस (मिरवणूक) काढण्यात येणार आहे. ही मिरवणूक दर्गाह पासून कंकालेश्वर रोड, चांदनी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक, माळीवेस चौक, धोंडीपुरा, बलभीम चौक, कारंजा, जुनी भाजी मंडई, बुंदेलपुरा, राजुरी वेस, बशीरगंज, जुने एस.पी. ऑफिस, गुलजार पुरा, अजीजपुरा, कागदी वेस, जुना बाजार, कादर पाशा मस्जिद येथे दुपारी 01:30 वाजता पोहोचेल व येथेच मिरवणुकीचे समापन होईल. या मिरवणुकीमध्ये नातगायन होणार आहे. मिरवणूक संपल्यावर मुहम्मद पैगंबर सल्लल्लाहू अलैही व सल्लम यांचे मुँह ए मुबारक ची ज़ियारत (केसदर्शन) करण्यात येईल. लंगर ए आम (महाप्रसाद) चे वाटप केजीएन मस्जिद शहेनशाह नगर येथे होणार असून याचा लाभ सर्व भाविक भक्तांनी घ्यावा. असे आवाहन केजीएन ग्रुपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सय्यद ज़हीर अली शाह कादरी यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून केले आहे.