बीड (रिपोर्टर)- कोरोना महामारीतून आरोग्यासह घरातली आर्थिक कोंडी दूर करताना नाकीनऊ येत असताना कोरोनावर मात करण्यात सर्वसामान्यांना यश येत आहे परंतु केंद्र सरकारच्या अवाढव्य कर प्रणालीमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमध्ये रोज वाढ होत अअसून गेल्या पाच दिवसांपासून सतत पेट्रोल-डिझेलची दरवाढ होत असल्याने बीडमध्ये पेट्रोलचे भाव प्रतिलिटर ९५.८५ पैशांवर जावून पोहचले आहे तर डिझेलचे भाव ८५.२९ पैशांवर जावून पोहचले आहेत. पेट्रोल शंभरीकडे गतीने वाटचाल करत असल्याने महागाईचा भस्मासूर आ वासत आहे.
२०२० चं वर्ष हे कोरोनामुळे घरबंद गेलं. हाताला काम नाही, घरात पैसा नाही यामुळे आर्थिक कोंडीतला सर्वसामान्य कसाबसा आपले आरोग्य सांभाळत दिवस काढत राहिला. कोरोनावर मात करण्यात सर्वसाामन्यांना आता कुठं यश येत आहे. मात्र दुसरीकडे केंद्र सरकार्या अवाढव्य कर प्रणालीमुळे पेट्रोल आणि डिझेलची रोजच दरवाढ होत असल्याने महागाई प्रचंड वाढत आहे. आधीच आर्थिक कोंडीत असलेल्या सर्वसामान्य माणसाला पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीने अधिक कोंडी करून टाकली आहे. गेल्या पाच दिवसांपासून सलग पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ होत आहे. आजही पेट्रोल आणि डिझेल २५ ते ३० पैशाने वाढले. इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार आज शनिवारी दिल्लीत पेट्रोलची किंमत प्रतिलिटर ८८.४४ तर मुंबईत पेट्रोल प्रति लिटर ९४.९३ वर जावून पोहचलं आहे. कोलकात्यामध्ये पेट्रोलचे दर प्रतिलिटर ८९. ७३ तर चेन्नईत ९०.७०, दिल्लीत डिझेलचे दर ७८.७४ तर मुंबईत डिझेलचे दर ८५.७० जावून पोहचले असून मराठवाड्यात पेट्रोलचे दर पेट्रोल दर ९६ रुपयांच्याही वर गेले आहेत. डिझेल ८६ रुपयांपर्यंत जात असून बीड जिल्ह्यात पेट्रोलचे दर ९५.८५ तर डिझेलचे दर ८५.२९ पैसे एवढे आहेत. अवघ्या काही दिवसात पेट्रोल शंभर रुपयांपर्यंत जाणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या घरात पुन्हा महागाईमुळे आर्थिक कोंडी होणार आहे.